वृत्तसंस्था/ बेंगळूर
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) चांद्रयान-3 च्या विक्रम लँडरचे फोटो शेअर केले आहेत. ही छायाचित्रे 6 सप्टेंबर 2023 रोजी चंद्राभोवती फिरणाऱ्या चांद्रयान-2 ऑर्बिटरच्या ‘ड्युअल-फ्रिक्वेन्सी सिंथेटिक अपर्चर रडार (डीएफएसएआर) उपकरणाने कॅमेराबद्ध केले आहेत. ‘डीएफएसएआर’ हे चांद्रयान-2 ऑर्बिटरवर बसवलेले एक प्रमुख वैज्ञानिक उपकरण असून ते एल आणि एस बँडमध्ये मायक्रोवेव्ह वापरते. हे अत्याधुनिक साधन सध्या कोणत्याही ग्रह मोहिमेवर सर्वोच्च रिझोल्यूशन असलेल्या ध्रुवीय प्रतिमा उपलब्ध करत आहे. ‘डीएफएसएआर’ गेल्या चार वर्षांपासून चंद्राच्या कक्षेतून उच्च दर्जाचा डेटा पाठवत आहे. भारताची चांद्रयान-2 मोहीम अंतिम क्षणी बारगळली असली तरी या मोहिमेंतर्गत चंद्राच्या दिशेने पाठविण्यात आलेला ऑर्बिटर अजूनही चंद्राच्या कार्यकक्षेत फिरत असून त्याच्याकडून माहिती व डेटा प्राप्त होत असतो.









