चित्रपटसृष्टीतील चतुरस्र अभिनेते ः नाटक, मालिका, मराठी-हिंदी चित्रसृष्टीत भरीव योगदान
प्रतिनिधी / पुणे
मराठी नाटक, मालिका तसेच मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील चतुरस्र अभिनेते विक्रम गोखले यांचे शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये निधन झाले. ते 77 वर्षांचे होते. त्यांच्यामागे पत्नी वृषाली व दोन मुली असा परिवार आहे. दरम्यान, सायंकाळी साडेसहाच्या सुमारास येथील वैकुंठ स्मशानभूमीच्या विद्युतदाहिनीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
गोखले यांच्यावर गेल्या 15 दिवसांहून अधिक काळापासून दीनानाथ रुग्णालयात उपचार सुरू होते. परंतु, त्यांची प्रकृती खालावत गेली. शुक्रवारी त्यांची तब्येत पुन्हा सुधारत असल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले होते. मात्र, शनिवारी त्यांची तब्येत पुन्हा बिघडली व त्यातच दुपारच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. गोखले यांच्या निधनाची माहिती रुग्णालय प्रशासनाने पत्रकार परिषद घेऊन दिली. पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे दुपारी चारच्या सुमारास विक्रम गोखले यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. ज्ये÷ नाटय़ दिग्दर्शक सतीश आळेकर, अभिनेते किशोर कदम, सुबोध भावे, राहुल सोलापूरकर, अभिनेत्री भाग्यश्री देसाई, पालकमंत्री चंद्रकातदादा पाटील, मेधा कुलकर्णी, अभय छाजेड,
राजेश दामले, प्रा. मिलिंद जोशी, सुनील महाजन व नाटय़-चित्रपट क्षेत्रातील अनेकांनी गोखलेंच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले.
सायंकाळी साडेसहा वाजता वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी डॉ. जब्बार पटेल, मल्हार पाटेकर, मिलिंद शिंत्रे, मिलिंद दास्ताने, गिरीश परदेशी आदींसह विविध क्षेत्रातील मंडळी उपस्थित होती.
गोखले यांचा जन्म 30 ऑक्टोबर 1945 साली पुण्यात झाला. त्यांचे शालेय शिक्षण वि. रा. वेलणकर शाळेत, तर महाविद्यालयीन शिक्षण पुण्यातील गरवारे कॉलेजमध्ये झाले. त्यांच्या पणजी दुर्गाबाई कामत या पहिल्या स्त्री अभिनेत्या, तर आजी कमलाबाई गोखले या पहिल्या बाल-अभिनेत्री. गोखले यांचे वडील चंद्रकांत गोखले यांनीही 71 हून जास्त हिंदी-मराठी चित्रपटांतून भूमिका केल्या. त्यामुळे त्यांना घरातूनच अभिनयाचा वारसा मिळाला.
‘बॅरिस्टर’मधून मिळाली ओळख…
विक्रम गोखले यांनी रंगभूमी गाजवली. कोल्हटकरांच्या ‘वाहतो ही दुर्वांची जोडी’ या नाटकातून त्यांनी रंगभूमीवर पदार्पण केले. मात्र, त्यांना खरी ओळख मिळाली, ती जयवंत दळवी लिखित ‘बॅरिस्टर’ या नाटकातून. मानवी नातेसंबंधांची अनोखी बाजू उलगडून दाखविणाऱया या नाटकाने रंगभूमीवर वेगळा इतिहास निर्माण केला. याशिवाय कमला, स्वामी यांसह विविध नाटकांमध्ये त्यांनी भूमिका केल्या. दरम्यानच्या काळात गोखले यांना घशाचा त्रास जाणवू लागला होता. घशाच्या त्रासामुळे रंगभूमीवर काम करणार नसल्याची घोषणा त्यांनी एका जाहीर कार्यक्रमात केली होती.
दिग्दर्शनातही ठसा
अभिनयासोबतच त्यांनी लेखन आणि दिग्दर्शनही केले आहे, त्यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘आघात’ हा चित्रपटाचे समीक्षकांनी विशेष कौतुक केले. 2013 साली प्रदर्शित झालेल्या ‘अनुमती’ या चित्रपटातील अभिनयासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले, नवोदित कलावंतांना अभिनय प्रशिक्षण देण्याचे अध्यापन कार्य अलीकडे गोखले करीत होते. अभिनय क्षेत्रात हयात घालवूनही उपेक्षित राहिलेल्या कलाकारांना त्यांच्या वृद्धापकाळी हक्काचे घर असावे, या उद्देशातून विक्रम गोखले यांनी स्वतःची जागा अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाला देऊन दातृत्वाचा मापदंडही प्रस्थापित केला होता.
विविध पुरस्कारांनी सन्मान
नाटय़क्षेत्रातील योगदानाबद्दल विक्रम गोखले यांना 2015 मध्ये ‘विष्णूदास भावे जीवनगौरव पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले होते.
अभिनयाचा वारसा पुढे नेला ः मुख्यमंत्री
भेदक नजर, भारदस्त आवाज आणि संयत अभिनयाने वैविध्यपूर्ण अशा भूमिकांचा नावाप्रमाणेच विक्रम करणाऱया प्रतिभावंत महान अभिनेत्याचे निधन कला क्षेत्राची हानी आहे. विक्रम गोखले यांना घरातूनच अभिनयाचा वारसा लाभला. हा वारसा त्यांनी दमदारपणे पुढे नेला.








