आगोंद येथील 2017 मधील खून : सोमवारी 17 रोजी होणार शिक्षा
मडगाव : ब्रिटिश बॅगपॅकर डॅनियली मॅकलॉग्लीन्न (28) हिच्यावर लैंगिक अत्याचार करून खून केल्याप्रकरणी संशयित विकट भगत याला न्यायालयाने दोषी ठरविले आहे. दक्षिण गोवा सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश क्षमा जोशी यांच्या न्यायालयाने काल शुक्रवारी हा निवाडा दिला. त्याला सोमवार दि. 17 रोजी शिक्षा सुनावली जाणार आहे. या प्रकरणात 46 साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आलेले आहेत. काणकोण येथील राजबाग आगोंद येथे 13 मार्च 2017 रोजी डॅनियलीचा खून झाला होता. खुनापूर्वी तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचेही वैद्यकीय अहवालातून स्पष्ट झाले होते. काणकोण पोलिसांनी याप्रकरणी तपास केला होता. तत्कालीन पोलिस निरीक्षक राजेंद्र प्रभुदेसाई यांनी या खुनाचा छडा लावून काणकोणातील भगतवाडा येथील संशयित विकट भगत याला अटक केली होती. त्यावेळी त्याचे वय 24 वर्षे होते. विकट व डॅनियली यांच्यात मैत्री होती व खुनानंतर डॅनियलीचा मोबाईलही चोरीला गेला होता. तिच्या अंगावर 7 जखमा होत्या. याप्रकरणी संशयित विकटचे तुरूंगातील वर्तनही चांगले नसल्याने बेड्या घालून सुनावणीस आणण्याचा आदेश यापूर्वी न्यायालयाकडून दिलेला होता.
व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर ही सुनावणी सुरू होती. मात्र, शुक्रवारच्या सुनावणीला संशयित विकट याला प्रत्यक्ष हजर करण्यास सांगण्यात आल्याने न्यायालयात हजर करण्यात आले होते. सरकारी वकील देवेंद्र कोरगावकर यांनी या आरोपीला मृत्युदंडाची शिक्षा द्यावी अशी मागणी न्यायालयात केली तर आरोपीचे वकील अरूण ब्राझ डीसा यांनी आपल्या अशिलाविरूद्ध कुठलाही पुरावा नसल्याने त्याला कमीत कमी शिक्षा द्यावी अशी मागणी न्यायालयात केली. डॅनियलीची आई व अन्य कुटुंबीय निवाडा ऐकण्यासाठी न्यायालयात हजर होते. शुक्रवारी दुपारी न्यायालयाने निवाडा जाहीर केल्यानंतर या कुटुंबीयांनी पाणावलेल्या डोळ्यांनी पत्रकारांशी बोलताना अखेर आम्हाला आठ वर्षांनी न्याय मिळाला, असे सांगताना न्यायदेवेतेचे आम्ही आभारी आहोत असे म्हटले. काणकोण पोलिसांनी विकटवर न्यायालयात एकूण 374 पानांचे आरोपपत्र दाखल केले होते व त्याच्यावर खून करणे, लैंगिक अत्याचार करणे, जबरी चोरी व पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आदी कलमाखाली गुन्हा नोंद केला होता.









