नितिश कटारा हत्या प्रकरणातील गुन्हेगार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी नितिश कटारा हत्याप्रकरणाचा गुन्हेगार विकास यादवचा अंतरिम जामीन एक आठवड्याने वाढविला आहे. विकास यादव 25 वर्षांपासून तुरुंगात शिक्षा भोगत आहे. न्यायाधीश एम.एम. सुंदरेश आणि एन. कोटिश्वर सिंह यांच्या खंडपीठाने दिल्ली उच्च न्यायालयाच्या 22 ऑगस्टच्या आदेशाच्या विरोधात दाखल याचिकेवर सुनावणी केली आहे. उच्च न्यायालयाने विकास यादवचा अंतरिम जामीन कालावधी वाढविण्यास नकार दिला होता. विकास यादवचा विवाह निश्चित झाल्याने त्याचा अंतरिम जामीन कालावधी वाढविण्यात यावा अशी मागणी त्याच्या वकिलाने खंडपीठासमोर केली. यावर निति श कटाराच्या आई नीलम कटारा यांच्या वकिलाने विरोध केला. विकास यादव (54 वर्षे)ने जुलै महिन्यात विवाह केला असल्याचा युक्तिवाद त्यांनी केला, तरीही सर्वोच्च न्यायालयाने विकास यादवचा अंतरिम जामीन कालावधी एक आठवड्याने वाढविला आहे. 5 सप्टेंबर रोजी विवाह आहे तसच 54 लाख रुपयांचा दंड भरण्याची व्यवस्था करायची असल्याचे सांगत विकास यादवने जामिनाची मागणी केली होती. हा दंड त्याला शिक्षेवेळी न्यायालयाने ठोठावला होता.









