रात्री उशिरापर्यंत नोंदणीकृत पदवीधर, महाविद्यालयीन शिक्षक मतदार संघाची मतमोजणी; आज निकालाचे अंतिम चित्र स्पष्ट होणार
कोल्हापूर प्रतिनिधी
शिवाजी विद्यापीठ विविध अधिकार मंडळासाठी चुरशीने झालेल्या निवडणूकीची मतमोजणीला बुधवारी सकाळी 8 सुरूवात झाली. दुपारपर्यंत अभ्यास मंडळ व विद्यापीठ शिक्षक संघाचा निकाल जाहीर झाला. रात्री उशिरापर्यंत झालेल्या निकालात आघाडीची बहुमत मिळवले आहे. यापुर्वी अभ्यास मंडळावर सुटाची असलेली मक्तेदारी मोडीत काढत आघाडीने आपले वर्चस्व प्रस्तापित केले. विद्यापीठ शिक्षक गटामध्ये सुप्टाने बाजी मारली आहे. बुधवारी हाती आलेल्या निकालावरून विकास आघडीची बहुमताकडे वाटचाल असल्याचे चित्र आहे.
शिवाजी विद्यापीठ विविध अधिकार मंडळासाठी सोमवारी कोल्हापूर, सांगली आणि सातारा या तिन्ही जिल्हय़ातील 33 केंद्रावर पार पडली. तर बुधवारी विद्यापीठ शिक्षक मतदार संघापासून मतमोजणीला सुरूवात झाली. दिवसभरात अभ्यास मंडळाचे निकाल जाहीर झाले असले तरी गुरूवारी पहाटेपर्यंत शिक्षक आणि नोंदणीकृत पदवीधर मतदार संघाची मतमोजणी सुरू होती. यापुर्वी 5 संस्थाचालक, 8 प्राचार्य, 2 पदवीधर, 2 ऍकॅडमीकच्या जागा बिनविरोध जाहीर करण्यात आली.
विद्यापीठातील 30 अभ्यास मंडळापैकी 19 आघाडी तर 10 सुटा आणि 1 अपक्ष उमेदवारांनी वर्चस्व मिळवले आहे, असा दावा आघाडी आणि सुटाच्या नेत्यांनी केला आहे. ज्या 9 अभ्यास मंडळासाठी निवडणूक लागली होती त्यामध्ये मात्र सुटाच्या उमेदवारांनी बाजी मारल्याचा दावा सुटाने केला आहे. यंदा मात्र अभ्यास मंडळावर सुटाची मोठी पिछेहाट झाली आहे. बिनविरोध झालेल्या अभ्यास मंडळाचा विकास आघाडीला मोठा फायदा झाला आहे. तसेच काही शिक्षकांनी रोमन आकडय़ांमध्ये नंबर टाकल्याने मते बाद होण्याचे प्रमाण यंदा ज्यादा आहे. रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या महाविद्यालयीन शिक्षक आणि नोंदणीकृत पदवीधर मतदारसंघातील निकालात आघाडीची वाटचाल बहुमताकडे आहे. असे असले तरी गुरूवारी अंतिम निकाल जाहीर झाल्यानंतर अंतिम चित्र जाहीर होणार आहे. दिवसभर विद्यापीठ निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. व्ही. एन. शिंदे, उपकुलसचिव एस. टी. बंडगर, पी. बी. जाखले, शिक्षक एस. डी. पवार, एस. ए. शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जवळपास 25 कर्मचारी मतमोजणीचे काम करीत होते. तर विद्यापीठातील सुरक्षा रक्षकांनीही दिवसभर आणि रात्रभर पाहारा ठेवून कोठेही वातावरणात तणाव निर्माण होवू नये याची काळजी घेतली.
रात्री उशिरा सर्वच विकास आघाडीसह सुटाच्या नेत्यांची उपस्थिती
बुधवारी दिवसभर सुरू असलेल्या मतमोजणीला ठराविक कार्यकर्ते उपस्थित होते. मात्र रात्री 8 नंतर महाविद्यालयीन शिक्षक तर रात्री 11 नंतर नोंदणीकृत पदवीधर मतदार संघातील मतमोजणी सुरू झाली. यामध्ये चुरशीची लढत असल्याने विकास आघाडी, सुटाच्या नेत्यांनी मतमोजणीच्या ठिकाणी गर्दी केली होती. याप्रसंगी सर्वच जागांवर आपले उमेदवार निवडूण येणार असल्याचा दावा दोन्ही आघाडीच्या नेत्यांनी केला.
निवडून आलेल्या उमेदवारांनी केला जल्लोष
शिवाजी विद्यापीठ, अभ्यास मंडळ, विद्या परिषद, महाविद्यलयीन शिक्षक मतदार संघाचा निकाल जाहीर झाल्यानंतर उमेदवार आणि नेत्यांनी विजयाची खून दाखवत जल्लोष केला. पदवीधर मतदार संघात विकास आघाडी आणि शिव-शाहू आघाडीमध्ये मोठी चुरस असल्याने मतमोजणी सुरू असताना पहाटेपर्यंत दोन्ही आघाडय़ांचे नेते विद्यापीठात बसून होते.
ऍकॅडमीक कौन्सिल
विद्यापीठ विविध अधिकार मंडळापैकी ऍकॅडमीक कौन्सिल सगळय़ात महत्वाचे मंडळ मानले जाते. यामध्ये रात्री 9.30 पर्यंत दोन उमेदवार निवडून आले. यामध्ये आघाडीचे उमेदवार दिलीपकुमार कसबे 1031 मतांनी निवडून आले. तर सुटाचे उमेदवार सुनील बनसोडे 1746 मतांनी निवडून आले.