वृत्तसंस्था/ मुंबई
व्यावसायिक मुष्टियुद्ध क्षेत्रातील भारताचा अव्वल मुष्टियोद्धा विजेंदर सिंग पुनरागमन करणार आहे. आता विजेंदर सिंग आणि घानाचा मुष्टियोद्धा इलियासू सुले यांच्यातील लढत 17 ऑगस्टला रायपूरमध्ये होणार आहे.
रायपूरमध्ये पहिल्यांदाच व्यावसायिक मुष्टियुद्ध लढत पर्पल गोट स्पोर्टस्टेनमेंट एलएलपी यांनी आयोजित केली आहे. ही लढत रायपूरमधील बलबिर सिंग जुनेजा स्टेडियममध्ये होणार आहे. या लढतीचे थेट प्रक्षेपण स्पोर्ट्स-18 खेल आणि वूट या वाहिनींवर केले जाणार आहे. या लढतीसाठी विजेंदर सिंगने आतापासूनच जोरदार सरावावर भर दिला असून प्रतिस्पर्धी सुलेवर निश्चित विजय मिळवेन, असा विश्वास त्याने वृत्तसंस्थेशी बोलताना व्यक्त केला. विजेंदर सिंगने यापूर्वी म्हणजे 19 महिन्यांच्या कालावधी अगोदर आपली शेवटची व्यावसायिक लढत खेळली होती. 2008 च्या बिजिंग ऑलिम्पिकमध्ये विजेंदर सिंगने कांस्यपदक मिळविले होते. सुलेविरुद्धच्या लढतीसाठी विजेंदर सिंग 8 ऑगस्टला भारतात येणार आहे. सध्या तो मँचेस्टरमध्ये मुष्टियुद्धचा सराव करीत आहे. घानाचा मुष्टियोद्धा सुले हा पश्चिम आफ्रिका मुष्टियुद्ध युनियनचा विद्यमान विजेता आहे. त्याने आतापर्यंत 8 लढती जिंकल्या आहेत. तो अद्याप एकाही लढतीत पराभूत झालेला नाही.









