वृत्तसंस्था/ भोपाळ
आशियाई क्रीडा स्पर्धेत पदक मिळविणाऱ्या विजयवीर सिद्धूने येथे झालेल्या 66 व्या राष्ट्रीय पिस्तुल नेमबाजी चॅम्पियनशिपमध्ये पुरुषांच्या 25 मी. सेंटर फायर प्रकारात सुवर्णपदक पटकावले.
पदकतक्त्यात हरियाणाने सर्वाधिक 45 पदके जिंकत अग्रस्थान पटकावले. त्यात 20 सुवर्णपदकांचा समावेश आहे. पुरुषांच्या 25 मी. रॅपिड फायर पिस्तुल सांघिक नेमबाजीत कांस्य मिळविलेल्या विजयवीरने 25 मी. सेंटर फायर पिस्तुल नेमबाजीच्या अंतिम फेरीत 587 गुण घेत सुवर्ण पटकावले. त्याने सीआयएसएफच्या उदित जोशीला मागे टाकले. उदितने 582 गुण घेत रौप्य मिळविले. पॅरिस ऑलिम्पिक कोटा मिळविणाऱ्या अनिश भनवालालानेही 582 गुण मिळविले. पण त्याला तिसरे स्थान मिळाले. इनर टेन्स कमी मिळविल्याने त्याला तिसरे स्थान देण्यात आले.
या प्रकारासाठी ऑलिम्पिक रौप्यविजेता विजय कुमार (575 गुण, 16 वे स्थान), ऑलिम्पियन गुरप्रीत सिंग (578, 11 वे), माजी आंतरराष्ट्रीय खेळाडू ओम्कार सिंग (582, चौथे), अमनप्रीत सिंग (580, आठवे) यांनीही भाग घेतला होता. ओम्कारने इंडियन नेव्हीला सांघिक जेतेपद मिळवून देण्यात यशस्वी ठरला. त्याच्यासमवेत रजत यादव, अमित कुमार यांनी भाग घेतला होता. तिघांनी मिळून 1741 गुण घेत पहिले स्थान मिळविले. उत्तरप्रदेशच्या अंकुर गोयलने सिव्हिलियन चॅम्पियनशिप जिंकताना 573 गुण नोंदवले तर तामिळनाडूने सिव्हिलियन चॅम्पियनशिपमध्ये सांघिक जेतेपद पटकावले.
तीन आठवड्यांच्या या चॅम्पियनशिप्समध्ये हरियाणाने 20 सुवर्ण, 13 रौप्य्। 12 कांस्यसह पहिले, 13 सुवर्ण, 3 रौप्य व 3 कांस्यसह महाराष्ट्राने दुसरे, पंजाबने 10 सुवर्णांसह तिसरे स्थान मिळविले. सिव्हिलियन चॅम्पियनशिपमध्ये मात्र उत्तर प्रदेशने पदकतक्त्यात पहिले स्थान पटकावले.









