प्रदेशाध्यक्ष बदलणार नसल्याचे स्पष्टीकरण : यत्नाळ यांच्या गटाची निराशा
प्रतिनिधी/ बेंगळूर
गेल्या काही दिवसांपासून गटबाजीमुळे राज्य भाजपमधील वाद चव्हाट्यावर आला आहे. पक्षश्रेष्ठींनी याची गांभीर्याने दखल घेतली आहे. शनिवारी बेंगळुरात आलेले राज्य भाजप प्रभारी राधामोहनदास अगरवाल यांनी बी. वाय. विजयेंद्र यांना अभय दिले असून प्रदेशाध्यक्ष बदलणार नसल्याचे सांगून हायकमांडची भूमिका स्पष्ट केली. त्यामुळे आमदार बसनगौडा पाटील-यत्नाळ यांच्या गटाची निराशा झाली असून त्यांना पक्षाच्या चौकटीत राहून समन्वयाने काम करण्याची सूचना दिली आहे.
राज्य भाजपमधील गटबाजीच्या राजकारणावर तोडगा काढण्यासाठी आलेल्या राज्य भाजप प्रभारी राधामोहनदास अगरवाल यांच्या उपस्थितीत राज्य भाजप कार्यकारिणीची बैठक घेण्यात आली. विजयेंद्र यांच्या नेतृत्त्वाला सातत्याने तीव्र विरोध करणाऱ्या आमदार यत्नाळ आणि त्यांच्या गटाला समन्वयाने काम करण्याची ताकीद दिली. पक्षश्रेष्ठींना याविषयी माहिती देण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी पक्षाच्या निष्ठावंत गटाला दिली.
बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना राधामोहनदास म्हणाले, राज्य भाजपात कोणतेही गटबाजीचे राजकारण नाही. शिवाय बी. वाय. विजयेंद्र यांना प्रदेशाध्यक्षपदावरून हटविले जाणार नाही. विजयेंद्र या पदासाठी योग्य आहेत, त्यामुळेच त्यांच्याकडे नेतृत्त्वा सोपविण्यात आले आहे. नेतृत्त्व बदलण्याचा अधिकार दोघांनाच आहे, तो म्हणजे पक्षाचे कार्यकर्ते आणि हायकमांङ कुणाच्या सांगण्यावरून पक्षनेतृत्त्वबदल होत नाही. योग्य वेळ आली तरच याविषयी निर्णय घेतला जातो, असे सांगून राधामोहनदास यांनी यत्नाळ आणि त्यांच्या गटाला विजयेंद्र यांना प्रदेशाध्यक्षपदावरून हटविणार नसल्याचा स्पष्ट संदेश दिला. आमदार यत्नाळ यांना पक्षाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. मात्र, नोटिशीला यत्नाळ यांनी अद्याप उत्तर दिलेले नाही, असेही ते म्हणाले.
कार्यकारिणी बैठकीला प्रारंभ होताच माजी मुख्यमंत्री डी. व्ही. सदानंदगौडा, येडियुराप्पा, विरोधी पक्षनेते आर. अशोक व इतर नेत्यांनी यत्नाळ यांच्या पक्षविरोधी भूमिकेबद्दल तक्रार केली. यत्नाळ यांना पक्षनेतृत्त्वाशी एकनिष्ठ राहण्याचा सल्ला द्यावा अन्यथा कारवाई करावी, अशी मागणी केली.
यत्नाळ यांनी सहकार्य करणे अपेक्षित : विजयेंद्र
काही नेत्यांच्या बेशिस्तीला लगाम घालण्यासाठी आणि हा विषय गंभीरपणे विचारात घेण्याचा निर्णय राज्य भाजपच्या कार्यकारिणी बैठकीत घेण्यात आला. यावेळी आमदार बसनगौडा पाटील-यत्नाळ यांनी सहकार्य करावे, अन्यथा त्यांचा विषय हायकमांडकडे आहे, असा इशारावजा संदेश प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांनी दिला. सर्व काही सुरळीत व्हावे या दिशेने प्रयत्न करावेत याची जाणीव केंद्रातील वरिष्ठ नेत्यांना करून देण्यासाठी कार्यकारिणी बैठकीत चर्चा झाली, असेही त्यांनी सांगितले.
पक्षाच्या राज्य कार्यकारिणी बैठकीयानंतर पत्रकार परिषदेत बोलताना विजयेंद्र म्हणाले, भाजपच्या चिन्हावर निवडून आलेले आमदार एस. टी. सोमशेखर, शिवराम हेब्बार हे मागील काही महिन्यांपासून पक्षविरोधी कारवायात गुंतले आहेत. काँग्रेससोबत उघडपणे दिसून येत आहेत. याविषयावर पूर्वी देखील चर्चा झाली होती. याला चाप लावून कठोर कारवाई करण्याची विनंती कार्यकारीणीने एकमताने केली आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राष्ट्रीय नेत्यांच्या निदर्शनास आणून तोडगा काढण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे, असे विजयेंद्र यांनी सांगितले.
पोटनिवडणुकीतील पराभव : सत्यशोधन समिती
अलीकडे झालेल्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीत संडूर व शिग्गावमध्ये पक्षाच्या उमेदवारांचा का पराभव झाला, याविषयी चर्चा करण्यात आली. पराभवाची कारणे शोधण्यासाठी माजी मुख्यमंत्री सदानंदगौडा, राज्य भाजपचे उपाध्यक्ष एन. महेश यांच्या नेतृत्त्वाखाली सत्यशोधन समिती नेमण्यात आली. ही समिती दोन्ही मतदारसंघांमध्ये संचार करून माहिती गोळा करणार आहे.
हेब्बार आणि सोमशेखर यांना निलंबित करण्याची आणि अपात्र ठरविण्याची मागणी कार्यकारिणीच्या सदस्यांनी केली आहे. ही बाबही वरिष्ठांच्या नजरेस आणून तातडीने निर्यय घेण्याची विनंती करणारा ठरावही बैठकीत संमत करण्यात आला.
आमदार यत्नाळ यांच्याविषयी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर अधिक बोलण्यास विजयेंद्र यांनी नकार दिला. हा मुद्दा वरिष्ठांच्या अंगणात आहे. यत्नाळ हे पक्षाच्या शिस्तपालन समितीसमोर हजर राहून आले आहेत. पक्षाच्या दृष्टीने त्यांची भूमिका योग्य नाही. यामुळे कार्यकर्तेही नाराज आहेत. कोणत्याही नेत्याने पक्षाच्या चौकटीत राहून चर्चा करावी. उघडपणे भाष्य करत फिरू नये, असे स्पष्ट केले.
विजयेंद्र समर्थक गटाकडून यत्नाळ यांच्याविरुद्ध तक्रार
राज्य भाजप नेतृत्त्वाविरुद्ध दंड थोपटलेल्या नेत्यांवर शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणी पक्षाच्या निष्ठावंत गटाने केली आहे. बेंगळूरमधील पक्षाच्या कार्यालयात माजी मंत्री एम. पी. रेणुकाचार्य, कट्टा सुब्रह्मण्य नायडू, माजी आमदार वाय. संपंगी, जगळूर रामचंद्र, एम. डी. लक्ष्मी नारायण व इतर नेत्यांनी राज्य भाजप प्रभारी राधामोहनदास यांची भेट घेऊन निवेदन दिले. राज्य भाजप नेतृत्त्वाविरुद्ध भूमिका घेतलेले नेते बसनगौडा पाटील-यत्नाळ आणि त्यांच्या गटातील नेत्यांवर अंकूश लावून शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.









