वायएसआर काँग्रेसचे नेते : राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा
वृत्तसंस्था/ विजयवाडा
वायएसआर काँग्रेस पक्षाचे (वायएसआरसीपी) संसदीय पक्षाचे नेते आणि पक्षाचे सरचिटणीस व्ही. विजयसाई रेड्डी यांनी शनिवारी राजकारणातून निवृत्तीची घोषणा केली. राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा देताना रेड्डी यांनी आता आपण कोणत्याही राजकीय पक्षात सामील होणार नाही असेही स्पष्ट केले. वायएसआरसीपीचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांचे जवळचे सहकारी आणि वायएसआर कुटुंबाचे आर्थिक सल्लागार अशी त्यांची ओळख होती.
राजकारणातून बाहेर पडण्याचा आपला निर्णय पूर्णपणे वैयक्तिक आहे, असे रे•ाr यांनी स्पष्ट केले आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वरील पोस्टमध्ये ‘माझा राजीनामा कोणतेही पद, फायदा किंवा आर्थिक लाभ मिळविण्यासाठी नाही. हा निर्णय पूर्णपणे वैयक्तिक आहे. माझ्यावर कोणताही दबाव, जबरदस्ती किंवा अनावश्यक प्रभाव नाही. चार दशके आणि तीन पिढ्यांपासून मला पाठिंबा देणाऱ्या वायएसआर कुटुंबाचा मी नेहमीच ऋणी राहीन.’ असे म्हटले आहे. त्याचबरोबर राज्यसभेत कार्य करण्याची संधी मिळाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही त्यांनी आभार मानले आहेत.
‘मला दोनदा राज्यसभा सदस्य म्हणून काम करण्याची संधी देणाऱ्या वायएस जगनजी यांचा आणि विशेषत: भरतम्माजी यांचा मी नेहमीच आभारी राहीन, असेही त्यांनी म्हटले आहे. त्यांनी मला राजकीय क्षेत्रात नवीन उंची गाठण्यास मदत केली. जगनमोहन यांना उत्तम आरोग्य, अपार यश, शाश्वत आनंद आणि उज्ज्वल भविष्य मिळावे अशी मी देवाकडे प्रार्थना करतो, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.









