हिंडलगा ग्राम पंचायतीचे दुर्लक्ष : श्रीनाथनगर, गोकुळनगर भागही अंधारात
बेळगाव : बेळगाव-वेंगुर्ला रोडवरील हिंडलगा ग्राम पंचायत कार्यक्षेत्रात येणाऱ्या विजयनगर दुसरा बसथांबा येथे पथदीप नसल्याने मोठी गैरसोय निर्माण झाली आहे. मात्र याकडे साफ दुर्लक्ष करण्यात येत असून नागरिकांना याचा फटका सोसावा लागत आहे. त्यामुळे ग्राम पंचायतीने याकडे तातडीने लक्ष देवून येथील पथदीप बसवावेत, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. बेळगाव-वेंगुर्ला पथदीपाचा प्रश्न अजूनही ऐरणीवर असून आता विजयनगर दुसरा बसथांब्याजवळही अशीच परिस्थिती निर्माण होत आहे. दरम्यान याच रस्त्यावरून श्रीनाथनगर व गोकुळनगरला जाणारा कॉर्नर आहे. त्या ठिकाणीही अंधार पडल्याने मोठी समस्या निर्माण होत आहे. येथील नागरिकांना अंधारातच पायवाट शोधावी लागण्याचा प्रकार घडत असून नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
पथदीप बसवण्याची मागणी
दरम्यान, या ठिकाणी एक तर थांब्याजवळ गतिरोधक नाही. याचबरोबर येणाऱ्या वाहनांचा प्रकाश थेट डोळ्यांवर पडतो. त्यामुळे रस्ता शोधणे कठीण होत आहे. तेंव्हा या परिसरातील पथदीप तातडीने बसवावेत, अशी मागणी स्थानिक नागरिकांतून करण्यात येत आहे. तेंव्हा ग्राम पंचायतीने लक्ष देवून पथदीप बसविण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज निर्माण झाली आहे.









