2026 मध्ये स्टॅलिन यांना आव्हान देण्याची योजना
वृत्तसंस्था/ चेन्नई
तामिळनाडूतील सुपरस्टार ‘थलापथी’ विजय राजकारणात प्रवेश करू शकतो. मागील काही काळापासून त्याच्या राजकारणातील एंट्रीसंबंधी चर्चा सुरू आहे. 2026 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत एम.के. स्टॅलिन यांच्या द्रमुकसमोर आव्हान निर्माण करण्याचा त्याचा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे. थलापथी विजयचे पूर्ण नाव जोसेफ विजय चंद्रशेखर आहे.
2024 च्या लोकसभा निवडणुकीनंतर विजय स्वत:चा पक्ष स्थापन करू पाहत आहे. त्याचा हा पक्ष 2026 ची तामिळनाडू विधानसभा निवडणूक लढवू शकतो. ऑल इंडिया थलापथी विजय मक्कल इय्यकम ही संघटना विजय यांच्या चाहत्यांनी निर्माण केली आहे. याला थलापथी किंवा लीडर या नावानेही ओळखले जाते. चित्रपटांव्यतिरिक्त विजय यांच्या सर्व घडामोडी याच बॅनर अंतर्गत आयोजित होतात. या संघटनेचे सदस्य तामिळनाडूच्या सर्व जिल्ह्यांमध्ये आहेत. राजकारणात उतरण्याचा निर्णय घेण्यापूर्वी विजय याच संघटनेद्वारे पार्श्वभूमी तयार करत आहे.
राजकीय पक्ष स्थापन करण्यापूर्वी आवश्यक असलेली पार्श्वभूमी सध्या तयार करत आहोत. आमच्या चाहत्यांना सद्यकाळात विशिष्ट स्थानिक कार्ये आणि कार्यक्रमांद्वारे उत्साहित केले जात आहे. मतदार आणि प्रमुख मुद्द्यांशी संबंधित मूलभूत डाटा सर्व जिल्ह्dयांमधून प्राप्त केला जात आहे. भविष्यात कुठले मुद्दे महत्त्वाचे असतील हे जाणून घेण्यासाठी काही संस्थांशी संपर्क साधण्यात आला आहे. पक्ष कधी स्थापन केला जाणार हे अद्याप निश्चित नाही, परंतु लोकसभा निवडणुकीनंतरच हे घडणार असे थलापथी विजय मक्कल इय्याकमच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले आहे.
2024 च्या लोकसभा निवडणुकीत विजय स्वत:चे राजकीय अस्तित्व दाखवून देणार नाही, परंतु त्यानंतर स्वत:ची राजकीय योजना अमलात आणणार आहे. विजय यांच्या पित्याने (दिग्दर्शक एस. ए. चंद्रशेखर) 2009 मध्ये स्वत:च्या राजकीय महत्त्वाकांक्षेनुसार फॅन ग्रूप स्थापन केला होता, परंतु विजय यांनी या फॅन ग्रूपपासून स्वत:ला दूर ठेवले हेत. तसेच स्वत:च्या आईवडिलांच्या विरोधात याप्रकरणी तक्रारही नोंदविली होती. यानंतर ही संघटना भंग करण्यात आली होती. विजय आता स्वबळावर राजकीय कारकीर्दीसाठी तयारी करत असून त्यांनी स्वत:च्या वडिलांनाही यापासून दूर ठेवले आहे.
राज्यात राजकीय पोकळी निर्माण होत नाही तोवर राजकारणाचा विचार करणार नसल्याचे विजय यांनी यापूर्वी म्हटले होते. सध्याचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन (द्रमुक) आणि माजी मुख्यमंत्री एडप्पादी पलानिस्वामी यांच्या पक्षाचे (अण्णाद्रमुक) वर्चस्व असलेल्या राज्याच्या राजकारणात सामील होण्याच्या निर्णयाचे संकेत विजय यांनी दिले आहेत.