माजी मुख्यमंत्री अन् माजी उपमुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
वृत्तसंस्था / अहमदाबाद
गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि माजी उपमुख्यमंत्री नितिन पटेल यांनी विधानसभा निवडणूक न लढविण्याची घोषणा केली आहे. नितिन पटेल यांनी भाजप अध्यक्ष सी.आर. पाटील यांना पत्र लिहून निवडणूक लढविण्याची इच्छा नसल्याचे कळविले आहे. रुपाणी सरकारमध्ये मंत्री राहिलेल्या 8 नेत्यांनी निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला आहे.
माजी मंत्री भूपेंद्र सिंह चुडासामा तसेच गृहराज्यमंत्री प्रदीपसिंह जाडेजा यांनीही निवडणूक न लढण्याचा निर्णय जाहीर केला आहे. तर ऊर्जामंत्री अन् बोटादचे आमदार सौरभ पटेल देखील निवडणुकीत भाग घेणार नाहीत. भावनगरचे आमदार अन् माजी मंत्री विभावरी देव यांनीही निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला आहे. रुपाणी सरकारमध्ये मंत्री राहिलेले पटेल, वल्लभ काकडिया, योगेश पटेल यांनीच अशाचप्रकारचा निर्णय घेतला आहे.
विजय रुपाणी हे राजकोट पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. तर नितिन पटेल हे मेहसाणा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. आनंदीबेन पटेल यांच्या जागी विजय रुपाणी यांनी मुख्यमंत्रिपद सांभाळले होते. परंतु 2021 मध्ये रुपाणी यांना पद सोडावे लागले होते. त्यांच्या जागी भूपेंद्र पटेल यांना मुख्यमंत्री करण्यात आले होते. नितिन पटेल हे 1990 पासून आमदार म्हणून कार्यरत आहेत.









