वृत्तसंस्था/ राजकोट
2023 च्या क्रिकेट हंगामातील शनिवारी येथे खेळविण्यात आलेल्या विजय हजारे करंडक वनडे क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामन्यात हरियाणा संघाने राजस्थानचा 30 धावांनी पराभव करत अजिंक्यपद पटकाविले. या सामन्यात हरियाणाने राजस्थानला 288 धावांचे आव्हान दिले. हरियाणा संघाने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 8 बाद 287 धावा जमविल्या. अंकीत कुमार आणि कर्णधार अशोक मिनारिया यांनी अर्धशतके झळकविली. प्रत्युत्तरादाखल खेळताना राजस्थानचा डाव 48 षटकात 257 धावात आटोपला. राजस्थानच्या अभिजित तोमरचे शतक तसेच राठोडचे अर्धशतक वाया गेले.
या सामन्यात हरियाणाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हरियाणाच्या डावात सलामीच्या अंकित कुमारने 91 चेंडूत 1 षटकार आणि 12 चौकारांसह 88 धावा जमविताना अशोक मिनारियासमवेत तिसऱ्या गड्यासाठी 124 धावांची भागिदारी केली. सलामीचा युवराज सिंग 1 धावेवर तर राणा 10 धावावर बाद झाले. कर्णधार मिनारियाने 96 चेंडूत 8 चौकारांसह 70 धावा जमविल्या. रोहित शर्माने 24 चेंडूत 1 चौकारांसह 20, निशांत सिंधूने 2 षटकार आणि 2 चौकारांसह 29, तेवातियाने 1 षटकार आणि 3 चौकारांसह 24, सुमितकुमारने 16 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारांसह नाबाद 28 धावा केल्या. हरियाणाच्या डावात 5 षटकार आणि 31 चौकार नोंदविले गेले. राजस्थानतर्फे अंकित चौधरी सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. अंकितने 49 धावात 4 तर अराफत खानने 59 धावात 2 तसेच राहुल चहरने 39 धावात 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना राजस्थानच्या डावात सलामीच्या अभिजित तोमरने 129 चेंडूत 2 षटकार आणि 10 चौकारांसह 106 धावा झळकाविल्या. तोमरने संघाची पडझड बऱ्यापैकी रोखून धरली होती. हरियाणाच्या भेदक गोलंदाजीसमोर राजस्थानची एकवेळ स्थिती 4 बाद 80 अशी केविलवानी होती. त्यानंतर तोमर आणि राठोड यांनी पाचव्या गड्यासाठी 121 धावांची भागिदारी केली. राठोडने 65 चेंडूत 5 षटकार आणि 4 चौकारांसह 79 धावा जमविल्या. राहुल चहरने शेवटपर्यंत खेळपट्टीवर राहत 1 षटकारासह नाबाद 18 धावा जमविल्या. लांबाने 3 चौकारांसह 20 धावा केल्या. हरियाणातर्फे हर्षल पटेल आणि सुमीतकुमार यांनी प्रत्येकी 3 तर तेवातिया व कंबोज यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक – हरियाणा 50 षटकात 8 बाद 287 (अंकितकुमार 88, अशोक मिनारिया 70, रोहित शर्मा 20, निशांत सिंधू 29, तेवातिया 24, सुमितकुमार नाबाद 28, अवांत्तर 15, अंकित चौधरी 4-49, अराफत खान 2-59, राहुल चहर 1-39), राजस्थान 48 षटकात सर्व बाद 257 (अभिजित तोमर 106, लांबा 20, राठोड 79, राहुल चहर नाबाद 18, अवांतर 18, सुमितकुमार 3-34, हर्षल पटेल 3-47, कंबोज 2-34, तेवातिया 2-50). राजकोट









