वृत्तसंस्था/ महाबलीपुरम
तमिळ अभिनेता आणि तमिलगा वेत्री कझगम (टीव्हीके) पक्षाचा प्रमुख थलपति विजय यांना पक्षाने 2026 च्या तामिळनाडू विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार म्हणून घोषित केले आहे. तसेच विजय यांनाच आघाडीवरून अंतिम निर्णय घेण्याचा अधिकारही देण्यात आला आहे. महाबलीपुरम येथील एका हॉटेलमध्ये बुधवारी आयोजित टीव्हीकेच्या विशेष महासभेत हा निर्णय सर्वसंमतीने घेण्यात आला. बैठकीत विजय देखील सामील झाले होते.
बैठकीत एकूण 12 प्रस्ताव संमत करण्यात आले, यात तामिळनाडूच्या महिलांची सुरक्षा, श्रीलंकेच्या नौदलाकडून भारतीय मच्छिमारांना होणारी अटक, मतदार यादीची एसआयआर प्रक्रिया यासारखे मुद्दे सामील होते.
करूर चेंगराचेंगरीच्या मृतांना श्रद्धांजली
विजय हे सर्व वर्गांच्या लोकांकडून पसंत केले जाणारे नेते आहेत. त्यांच्या नेतृत्वात पक्ष 2026 च्या विधानसभा निवडणुकीत उतरणार आहे. अन्य पक्षांसोबत आघाडीशी निगडित प्रत्येक निर्णय घेण्याचा अधिकार विजय यांना देण्यात येत असल्याचे टीव्हीके महासभेने स्वत:च्या प्रस्तावात म्हटले आहे. तर बैठकीच्या प्रारंभी करूर रॅलीत झालेल्या चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्या 41 लोकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. तर अन्य एका प्रस्तावात विजय यांना पुरेशी पोलीस सुरक्षा पुरविण्याची मागणी करण्यात आली आहे.
रणनीतिक निर्णय योग्यवेळी
वर्तमान राजकीय वातावरण पक्षाच्या बाजूने आहे, याचमळे आगामी निवडणुकीवरून रणनीतिक निर्णय योग्यवेळी घेण्यात येणार आहेत असे विजय यांनी बैठकीत म्हटले आहे. टीव्हीकेने तामिळनाडू विधानसभा निवडणूक स्वबळावर लढविणार असल्याची घोषण यापूर्वीच केली आहे. विजय यांनी अलिकडच्या काळात राज्यातील सत्तारुढ द्रमुक सरकारवर जोरदार टीका केली आहे. तर विजय यांची राज्यातील लोकप्रियता वेगाने वाढत आहे.









