फ्रूट सॉफ्टवेअरमध्ये अपलोड : शेतकऱ्यांना आवाहन, कृषी खात्याचे अधिकारी-कर्मचारी नोंदणी प्रक्रियेत व्यस्त
बेळगाव : दोन वर्षापूर्वी कृषी माहिती संकलित करण्यासाठी आणि कृषी विभागाच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या फ्रूट्स सॉफ्टवेअरच्या माध्यमातून अधिक सुविधा देण्यासाठी शेतकऱ्यांच्या नोंदणी कामाला प्रारंभ झाला आहे. संबंधित शेतकऱ्यांनी आधारकार्ड, सातबारा उतारा, बँक पासबुक, फोटोसह जवळच्या रयत संपर्क केंद्रात नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. यंदा खरीप हंगामात शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. शासनाने जिल्ह्यासाठी 320 कोटी रुपयांचा निधी घोषित केला आहे. या पार्श्वभूमीवर कृषी खात्याकडून शेतकऱ्यांच्या जमिनीची नोंदणी केली जात आहे. यासाठी रयत संपर्क केंद्रात शेतकऱ्यांकडून संबंधित कागदपत्रे स्वीकारली जात आहेत.
शासनाने शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन, बागायती पिके, मासेमारी आणि इतर शेतीसाठी अनुदान आणि कर्जसुविधा उपलब्ध केल्या आहेत. यासाठी शेतकऱ्यांना एफआयडी क्रमांकदेखील बंधनकारक आहे. ज्या शेतकऱ्यांकडे एफआयडी क्रमांक नाही, त्यांनी जवळच्या रयत संपर्क केंद्रात संपर्क करणे गरजेचे आहे. दुष्काळ निवारण्यासाठी शासनाकडून बँक कर्जासह विविध सुविधा पुरविल्या जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर रयत संपर्क केंद्रांमध्ये शेतकऱ्यांच्या शेतजमिनीची सविस्तर माहिती संकलन केली जात आहे. शिवाय फ्रूट सॉफ्टवेअरमध्ये ती अपलोड केली जात आहे. त्यामुळे कृषी खात्याचे अधिकारी आणि कर्मचारी या नोंदणी प्रक्रियेत व्यस्त झाले आहेत.
शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा
कृषी आणि इतर संबंधित विभागासाठी एकत्रित माहिती करण्यासाठी फ्रूट सॉफ्टवेअर विकसित केले आहे. जिल्ह्यात नोंदणी प्रक्रियेचे काम जोमाने सुरू आहे. नवीन एफआयडीसाठी शेतकऱ्यांनी कृषी आणि बागायत खात्याच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा.
– शिवनगौडा पाटील (सहसंचालक कृषी खाते)









