नगरसेवकांच्या निधीत झाली कपात : 40 ऐवजी मिळणार 27 लाखच
प्रतिनिधी/ बेळगाव
नगरसेवकांना आपल्या प्रभागातील विकास साधण्यासाठी 40 लाखांचा निधी दिला जाणार, अशा बातम्या प्रसिद्ध झाल्या. मात्र प्रत्यक्षात केवळ 27 लाखच मिळणार आहेत. त्यामुळे नगरसेवकांनी इतक्या निधीमध्ये कोणता विकास करायचा? जनतेला आम्ही काय उत्तरे देऊ? असा प्रश्न मनपा सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या सर्वसाधारण सभेमध्ये केला.
बुधवारी सर्वसाधारण सभा घेण्यात आली. त्यामध्ये सर्वच नगरसेवकांनी त्या विरोधात आवाज उठविला. एसएफसी आणि 15 व्या वित्त आयोगअंतर्गत हा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 16 आणि 11 लाखांचा हा निधी असून एकूण 27 लाख दिले जाणार असल्याचे अभियंत्या लक्ष्मी निपाणीकर यांनी सांगितले. त्यावेळी पूर्वी आम्हाला 40 लाख सांगितला. आता इतकाच निधी का? असा प्रश्न केला. यावर आम्ही 40 लाख निधी मंजूर झाल्याचे सांगितले नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी जी कामे पूर्ण झाली आहेत, त्यामध्ये जो शिल्लक निधी आहे तो निधी संबंधित प्रभागालाच खर्च करावा, अशी मागणी नगरसेवकांनी केली. अजून त्याबाबतचा तपशील तयार झाला नाही. पुढील बैठकीत तपशील दिला जाईल, असे लक्ष्मी निपाणीकर यांनी स्पष्ट केले.
शहापूर येथील निकृष्ट काम करणाऱ्या कंत्राटदाराला पाठीशी
शहापूर येथे डेकोरेटेड खांब उभे करण्यात आले आहेत. ते काम निकृष्ट दर्जाचे असून संबंधित कंत्राटदारावर कारवाई करावी, अशी मागणी केली. मात्र भाजपच्या नगरसेवकांनी त्याला विरोध करत निकृष्ट काम करणाऱ्या कंत्राटदाराला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात आले.
नगरसेवक रवी साळुंखे यांनी याबाबत तक्रार नोंदविली. त्यावरून भाजपचे नगरसेवक जोरदार विरोध करू लागले. या मागचे नेमके गौडबंगाल काय? असा प्रश्न सर्वच नगरसेवकांना पडला. स्मार्ट सिटीअंतर्गत काम झाले असून स्मार्ट सिटीच्या बैठकीत यावर चर्चा करण्याचा निर्णय घेतला. मात्र संबंधित अधिकाऱ्यांना बोलावूनच या कामांचा कंत्राटदार कोण? अशा चौकशीची मागणी आमदार राजू सेठ यांनी केली. त्यावर पुढील बैठकीत कंत्राटदाराला बोलावून चौकशी करण्याचे ठरविण्यात आले.
नगरसेवकांना खराब झालेल्या खुर्ची
नगरसेवक शंकर पाटील यांनी आम्हाला देण्यात आलेली खुर्चीच मोडली आहे. त्यामुळे आम्ही कोठे बसायचे? हवे तर जमिनीवर बसू. मात्र त्याबाबत आम्हाला सूचना करावी. खराब झालेली खुर्ची देऊ नये, अशी मागणी केली. यामुळे सभागृहात एकच गोंधळ उडाला. या प्रश्नामुळे अधिकारी आणि महापौरदेखील निरुत्तर झाल्या होत्या.
‘त्या’ कंत्राटदाराला पुढील बैठकीत सभागृहात बोलवा
शहरातील डेकोरेट लाईट्स, एलईडी लाईट्सचे कंत्राट एका कंपनीला देण्यात आले होते. राहुल चक्रवर्ती असे त्या कंपनी मालकाचे नाव आहे. त्यांनी नगरसेवकाला उद्धट उत्तरे दिली होती. त्यामुळे त्यांना या सर्वसाधारण सभेमध्ये बोलाविण्यात आले होते. मात्र त्यांनी आपला प्रतिनिधी पाठविला होता. ते स्वत: उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे पुढील बैठकीत त्यांना उपस्थित राहण्याची सूचना द्यावी व त्यानंतरच त्यांना पुढील कंत्राट द्यावे, अशी जोरदार मागणी नगरसेवकांनी केली आहे.









