मांजाने बळी घेतलेल्या वर्धनच्या कुटुंबात दुःखाचा काळोख
प्रतिनिधी /बेळगाव
‘घर घर में दिवाली, मेरे घर में अंधेरा’ असे हिंदी चित्रपटातील एक गीत आहे. मांजाने बळी घेतलेल्या वर्धन इराण्णा बेली याच्या आईची व कुटुंबीयांची मनस्थिती नेमकी अशीच झाली आहे. ऐन दिवाळीत या घरात दुःखाचा काळोख पसरला आहे. दुर्दैवाने हौस कोणाची व भोगते कोण? असेच वर्धनाच्या बाबतीत म्हणावे लागेल.
मांजाच्या दोऱयामुळे वर्धन या बालकाचा बळी गेला आहे. बेळगावमध्ये दुर्घटना घडल्याशिवाय प्रशासन जागे होत नाही व कारवाई करत नाही. पतंगाच्या मांजामुळे सतत या घटना घडत आहेत. आज जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. संजीव पाटील यांनी आवाहन केले आहे. परंतु तोपर्यंत पुलाखालून बरेच पाणी गेले आहे.
दिवाळीसाठी हौसेने कपडे खरेदी करण्यासाठी आलेला वर्धन वडिलांबरोबर दुचाकीवरून परत हत्तरगी गावी जात असताना त्याच्या गळय़ात मांजा अडकला व त्याचा मृत्यू झाला. यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत. परंतु त्यावर कडक कारवाई झालेली नाही.
दिवाळीनंतर सर्वत्र पतंग उडविण्यास प्रारंभ होतो. यामुळे विपेत्यांना रोजगार मिळतो व मुलांचीही हौस होते. हे खरे असले तरी त्यामुळे काही जणांचा जीवही हकनाक जातो, हे वास्तव आहे. कायदे केले तरी त्यांची अंमलबजावणी होतेच असे नाही. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गावरसुद्धा परस्पर विरुद्ध दिशेने वाहने हाकण्याचे प्रकार पाहायला मिळतात. विद्युतभारित तारा इतरत्र लोंबकळलेल्याही दिसतात. यावर वेळीच उपाय न झाल्याने वर्धनसारखे जीव गमावतात.
मुळात मांजा तयार करण्यासाठी काचेची आवश्यकता भासते. काचेची पूड करून ती दोऱयाला लावली जाते. जेणेकरून आपला पतंग दुसऱयापेक्षा वर उडत राहावा व दुसऱयाचा पतंग अधिक वर गेला तर मांजाच्या साहाय्याने कापला जावा, ही जीवघेणी स्पर्धा अत्यंत साध्या खेळांमध्येसुद्धा शिरली आहे. मांजाचे दुष्परिणाम मुलांच्या लक्षात न आल्यामुळे मांजासाठी काचा गोळा करताना किंवा त्याची पूड करताना मुले आढळली तर पालकांनी वेळीच सावध व्हायला हवे. यासाठी आता प्रत्येकांनीच याबाबत जागृती करणे आवश्यक आहे.
पतंगाच्या मांजा दोरावर बंदी : जिल्हा पोलीसप्रमुखांनी काढला आदेश
दरवषी पतंगाच्या मांजा दोराने अनेकजण जखमी झाले आहेत. तर काही जणांचा बळीही गेला आहे. रविवार दि. 23 रोजी देखील गांधीनगर ओव्हरब्रिजजवळ एका मुलाचा बळी गेल्यानंतर पोलीस प्रशासन खडबडून जागे झाले आहे. त्यानंतर त्याची गांभीर्याने दखल जिल्हा पोलीसप्रमुखांनी घेतली. जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. संजीव पाटील यांनी तातडीने मांजा दोराच्या विक्रीवर आणि खरेदीवर बंदी घातल्याचा आदेश बजावला आहे. जिल्हा पोलीसप्रमुखांनी आदेश काढला. मात्र पोलीस आयुक्तांनी रात्री उशिरापर्यंत तरी असा कोणताच आदेश काढला नाही.
वर्धन इराण्णा बेली (वय 6, रा. हत्तरगी, ता. हुक्केरी) या मुलाचा मांजा दोराने बळी घेतला होता. यापूर्वीच मांजा दोऱयावर बंदी घालावी, अशी मागणी वारंवार करण्यात आली होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. आता ज्या ठिकाणी मांजा दोऱयाची विक्री सुरू आहे, तसेच कोणीही मांजा विकत घेतल्यास तातडीने पोलीस प्रशासनाकडे तक्रार करावी, तक्रार करणाऱयाचे नाव गुपीत ठेवले जाईल, असेही सांगण्यात आले आहे.
मांजा आढळल्यास संबंधित मूल-पालकांवरही कारवाई
जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. संजीव पाटील यांनी हा आदेश बजावला आहे. यापुढे पतंगाला मांजा आढळला तर संबंधित मुलांवर तसेच त्यांच्या पालकांवरही कारवाई केली जाणार आहे. मांजा दोऱयाने पतंग उडवत असतील तर त्या संबंधीची माहिती पोलिसांना द्यावी. पोलीस प्रशासनाने 9480804000 या क्रमांकावर संपर्क साधावा, असेही आवाहन केले आहे.









