देशवासियांनी घाबरण्याचे कारण नसल्याचा डॉ. गुलेरिया यांचा निर्वाळा
भारतातील कोरोना संसर्ग परिस्थिती नियंत्रणात
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
जगभरातील काही देशांमध्ये कोरोनाची बिघडलेली स्थिती पाहता लोकांमध्ये भीती स्पष्टपणे दिसून येत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून केंद्र सरकारने परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून राज्यांना मार्गदर्शक सूचनाही जारी केल्या आहेत. देशात तपासणी चाचण्याही वाढवण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आरोग्यतज्ञ सतत सर्व लोकांना कोविडपासून बचावासाठी योग्य वर्तनाचे पालन करण्याचे आवाहन करत आहेत. तथापि, सध्या भारतातील परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असल्याने कठोर निर्बंधांची आवश्यकता नसल्याचे प्रतिपादन आरोग्य क्षेत्रातील वरिष्ठ तज्ञांनी केले आहे. तसेच कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे लोकांना घाबरण्याची गरज नसल्याचे प्रतिपादनही त्यांनी केले.
भारतातील सध्याची कोविड परिस्थिती पाहता, याक्षणी आंतरराष्ट्रीय उड्डाणे बंद करण्याची किंवा लॉकडाऊन लादण्याची गरज नाही, असे एम्सचे माजी संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. भारतीय लोकांमध्ये ‘हायब्रीड इम्युनिटी’ वाढल्यामुळे येथे संसर्ग वाढला तरी गंभीर प्रकरणे किंवा रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज भासणार नाही. तथापि, सर्व लोकांनी प्रतिबंधात्मक उपायांचे सतत पालन करणे आवश्यक आहे. काही सावधगिरी बाळगून, आपण संसर्गाच्या पुढच्या लाटेचा धोका कमी करू शकतो. चांगल्या लसीकरण कव्हरेजमुळे आणि नैसर्गिक संसर्गामुळे भारतीय लोकांमध्ये आधीच प्रतिकारशक्ती वाढल्यामुळे लोकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन गुलेरिया यांनी केले आहे.
लॉकडाऊनची गरज नाही ः आयएमए
इंडियन मेडिकल असोसिएशनचे (आयएमए) डॉ. अनिल गोयल यांनी भारतात लॉकडाऊनची गरज भासणार नाही, अशी स्पष्टोक्ती दिली आहे. भारतातील लोकांची प्रतिकारशक्ती चीनपेक्षा अधिक मजबूत आहे. भारतातील 95 टक्के लोकसंख्येची कोरोना विरुद्ध प्रतिकारशक्ती अतिशय मजबूत आहे. साहजिकच देशात लॉकडाऊन होणार नाही, असे मत डॉ. गोयल यांनी व्यक्त केले आहे.
चीनसह पाच देशांतील प्रवाशांची आरटी-पीसीआर होणार
जगभरात वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. चीन, जपान, हाँगकाँग, बँकॉक आणि दक्षिण कोरियामधून भारतात येणाऱया लोकांसाठी आरटी-पीसीआर चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे. याबाबत लवकरच सविस्तर आदेश काढण्यात येणार असल्याचे शनिवारी आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी सांगितले. आम्ही या मुद्दय़ावर विमान वाहतूक मंत्रालयाशी बोलत आहोत. ज्या प्रवाशांचा आरटी-पीसीआर रिपोर्ट पॉझिटिव्ह येईल किंवा ज्यांना तापासारखी लक्षणे आढळतील, त्यांना क्वारंटाईन केले जाईल, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच चीन, जपान, दक्षिण कोरिया, हाँगकाँग आणि थायलंडमधून येणाऱया आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी विमान वाहतूक मंत्रालयाचा आदेश जारी करण्यात आला आहे. याअंतर्गत सध्याची आरोग्य स्थिती जाहीर करण्यासाठी हवाई सुविधा फॉर्म भरणे बंधनकारक करण्यात आले आहे.









