पोलिसांच्या व्यापक बंदोबस्तासह जलद कृती दलाची तुकडीही मागविणार
बेळगाव : गणेशोत्सवासाठी बेळगाव शहर सज्ज झाले आहे. वर्षानुवर्षे सार्वजनिक श्रीमूर्तींची संख्याही वाढत आहे. यंदा बेळगाव शहर व तालुक्यात एक हजारहून अधिक सार्वजनिक श्रीमूर्तींची स्थापना होणार असून यासाठी गणेश मंडळे व प्रशासन सज्ज झाले आहे. उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलानेही व्यापक बंदोबस्त ठेवला आहे. पोलीस दलाकडील नोंदीप्रमाणे बेळगाव शहर व तालुक्यात 1,073 सार्वजनिक श्रीमूर्तींची स्थापना होणार आहे. इतक्या मोठ्या संख्येत मंडळांनी गणेशोत्सवाची तयारी केली असून प्रशासनाशी पत्रव्यवहार केला आहे. श्रींच्या आगमनापासून विसर्जनापर्यंतच्या बंदोबस्ताची सर्व तयारी करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग,उपायुक्त रोहन जगदीश आदी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्ताची तयारी केली आहे. दोन टप्प्यात बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले असून यासाठी साडेतीन हजारहून अधिक पोलीस, होमगार्ड जुंपण्यात येणार आहेत.श्री विसर्जन मिरवणुकीसाठी जलद कृती दलाची एक तुकडीही मागविण्यात येणार आहे.
पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग यांनी पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेऊन बंदोबस्ताचा आढावाही घेतला आहे. शांतता समितीची पोलीस स्थानकनिहाय व सर्व मंडळांची बैठकही झाली आहे. उत्सव शांततेत व उत्साहात पार पाडण्यासाठी पोलीस दलाच्यावतीने गणेशोत्सव मंडळांना काही लेखी सूचना केल्या आहेत. सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, चोवीस तास स्वयंसेवक तैनात करणे, कर्कश आवाजाच्या साऊंड सिस्टीमचा वापर न करणे आदी सूचना केल्या आहेत, अशी माहिती पोलीस आयुक्तांनी ‘तरुण भारत’शी बोलताना दिली. उपलब्ध माहितीनुसार श्रींच्या स्थापनेपासून विसर्जनापर्यंतचे नियोजन करण्यात आले आहे. पहिल्या व दुसऱ्या दिवशी प्रत्येकी 1, तिसऱ्या दिवशी 2, पाचव्या दिवशी 46, सहाव्या दिवशी 1, सातव्या दिवशी 48, नवव्या दिवशी 9 व अनंत चतुर्दशीला 965 सार्वजनिक श्री मूर्तींचे विसर्जन होणार आहे. यापैकी अधिकाधिक कपिलेश्वर तलाव, जक्कीनहोंडा परिसरात विसर्जन होणार आहे.
दोन टप्प्यात बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यासाठी पोलीस आयुक्त, 2 डीसीपी, 3 एएसपी, 5 एसीपी, 23 पोलीस निरीक्षक, 30 उपनिरीक्षक, 115 साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक व 824 स्थानिक पोलिसांबरोबरच 2 पोलीस उपअधीक्षक, 26 पोलीस निरीक्षक, 15 उपनिरीक्षक, 30 साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक व 350 हवालदार व पोलीस, 600 होमगार्ड व राज्य राखीव दलाची तुकडी बाहेरून मागविण्यात आली आहे. श्रींच्या प्रतिष्ठापनेपासून शेवटच्या दिवसापर्यंत एक टप्पा तर विसर्जन बंदोबस्त दुसऱ्या टप्प्यात होणार आहे. यासाठी स्थानिक उपलब्ध बळाबरोबरच 4 एसपी, 20 एसीपी, 48 पोलीस निरीक्षक, 98 पोलीस उपनिरीक्षक, 170 साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, 1900 हवालदार पोलीस, राज्य राखीव दल व शहर सशस्त्र दलाच्या तुकड्यांसह 3500 हून अधिक बळ तैनात करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग यांनी दिली.









