सहा जिल्ह्यात दंडात्मक कारवाई : 11 कोटींचा दंड, काही विद्युत उपकरणेही जप्त
बेळगाव : बेळगावसह सहा जिल्ह्यात वीज चोरी करणाऱ्यांविरुद्ध हेस्कॉम व्हिजीलन्स पथकाने जोरदार कारवाई केली आहे. सहा जिल्ह्यात वीज चोरी करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून 11 कोटी रुपयांचा दंड घालण्यात आला आहे. हुबळी येथील हेस्कॉम व्हिजीलन्सचे पोलीसप्रमुख चन्नबसवण्णा एस. एल. यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. हुबळी, बेळगाव, चिकोडी, गदग, हावेरी, कारवार, बागलकोट, विजापूर जिल्ह्यात वीज चोरी करणाऱ्यांविरुद्ध मोहीम राबविण्यात आल्याची माहिती व्हिजीलन्सच्या अधिकाऱ्यांनी दिली.
सहा जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांनी या कारवाईत भाग घेतला असून मीटर टॅम्परिंग, बेकायदा वीज जोडणीचे प्रकार उघडकीस आले आहेत. अधिकाऱ्यांनी काही विद्युत उपकरणेही जप्त केली असून वीज चोरी करणाऱ्यांविरुद्ध कारवाई केल्याची माहिती पोलीसप्रमुख चन्नबसवण्णा एस. एल. यांनी दिली. विजेची गळती व चोरी रोखण्यासाठी जनजागृती अभियानही राबविण्यात येत आहे. गावोगावी भेटी देऊन जागृती करण्यात येत आहे. कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता व शुल्क न भरता थेट वीज जोडणी घेतल्यांविरुद्ध कारवाई करण्यात येत आहे. सरकारची फसवणूक करण्याचाच हा प्रकार आहे.









