दुर्गामाता दौडनिमित्त महिला व ग्रामस्थांचा उपक्रम
वार्ताहर/ किणये
दौडमध्ये महिलांनी जात्यावर दळण दळताना, सुपाने धान्य पाखडताना, सामूहिक पद्धतीने गाणे म्हणताना, उखळात कांडप करताना, पाळणगीत म्हणताना, अशी विविध प्रकारचे सजीव देखावे सादर करून पंचक्रोशीतील नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.
सध्याच्या आधुनिक युगात हा ग्रामीण पारंपरिक सजीव देखावा पाहण्यासाठी पश्चिम भागातील नागरिकांनी सोनोली गावात मोठ्या संख्येने गर्दी केली होती. गावातील बालचमू व तरुण व तरुणींनी छत्रपती शिवाजी महाराज, झांशीची राणी, राधाकृष्ण, संत बाळूमामा आदींच्या वेषभूष धारण केल्या होत्या. काही तरुणांनी पूर्वीच्या काळातील वैद्य, रुग्णांना कशा पद्धतीने आयुर्वेदिक औषध देऊन उपचार करत होते. हा देखावाही सादर केला होता.
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान शाखा सोनोली व ग्रामस्थांतर्फे शनिवारी दुर्गामाता दौडचे आयोजन केले होते. वेशीतून दौडला सुरुवात करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन गंगाराम कणगुटकर यांनी केले. विणा पूजन हभप परशराम कणगुटकर महाराज यांनी केले. ध्वज पूजन प्रशांत कडोलकर यांनी केले. बळवंत लोहार व जोतिबा पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
दुर्गामाता दौडनिमित्त गावातील प्रत्येक गल्ल्यांमध्ये रांगोळ्या घालण्यात आल्या होत्या. भगवे पताका लावल्या होत्या. महिला आरती ओवाळून दौडचे स्वागत करीत होते. ध्येयमंत्र व प्रेरणामंत्र सुरू होते. वेशीपासून बाबुराव कॉलनी, गणपत गल्ली, पाटील गल्ली, हनुमान गल्ली, चव्हाट गल्ली आदी ठिकाणी जल्लोषात दौड काढण्यात आली.









