वार्ताहर/किणये
मराठा मंडळ हायस्कूल किणये, सरस्वती हायस्कूल किणये व गावातील प्राथमिक मराठी शाळा या तीन शाळांच्या वतीने आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी गावात विद्यार्थ्यांनी दिंडी काढली. या दिंडीत मुला मुलींनी विविध वेशभूषा परिधान केल्या होत्या. यामुळे या दिंडीत मराठमोळ्या संस्कृतीचे दर्शन घडले. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानोबा माउली तुकाराम…. असा जयघोष या विद्यार्थ्यांनी केला. यामुळे अवघी किणये नगरी दुमदुमली होती. विद्यार्थ्यांनी काढलेल्या या दिंडीचे गावात जल्लोषात स्वागत करण्यात आले.
मराठा मंडळ तिन्ही हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी हायस्कूलपासून दिंडीला सुऊवात केली. प्रारंभी मुख्याध्यापक एस. एम. वडेबैलकर यांनी प्रास्ताविक करून आषाढी वारीचे महत्त्व सांगितले. एसडीएमसी कमिटीचे अध्यक्ष अनंत पाटील व नागोजी मुतगेकर यांच्या हस्ते विठ्ठल रखुमाई प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर टाळ मृदुंगाच्या गजरात हायस्कूल परिसरातून दिंडीला सुऊवात करण्यात आली. ही दिंडी किणये जांबोटीमार्गे किणये गावात आली.दिंडी गावातील मंदिरात आल्यानंतर त्या ठिकाणी विठ्ठल रखुमाई मूर्तीचे पूजन करण्यात आले व त्यानंतर दिंडी पुन्हा हायस्कूलकडे मार्गस्थ झाली.
क्रीडा के. आय. हैबती, शिक्षक ओमकार अंगडी, स्मिता देसाई, उज्ज्वला खामकर, चंद्रलेखा नाईक, सुप्रिया पाटील आदींनी विद्यार्थ्यांना दिंडी काढण्यासाठी मार्गदर्शन केले. दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित सरस्वती हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनीही गावात दिंडी काढली. या दिंडीत मुलांनी हातात भगवे ध्वज घेऊन विठ्ठलाचे विविध अभंग गायीले. दिंडी गावातील विठ्ठल रखुमाई मंदिर व संपूर्ण गावभर फिरली. मुख्याध्यापक व सहशिक्षक दिंडीत सहभागी झाले होते. प्राथमिक मराठी शाळेतर्फेही दिंडीचे आयोजन केले होते. तिन्ही दिंड्या विठ्ठल रखुमाई मंदिराजवळ एकत्र आल्यानंतर गावात विठुनामाचा गजर झाला व त्या ठिकाणी महाआरती करण्यात आली.