वृत्तसंस्था /टॉरंटो
कँडिडेट्स बुद्धिबळ स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत भारताचा ग्रँडमास्टर विदित गुजराथी याने जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असलेल्या अमेरिकेच्या हिकारू नाकामुराला पराभूत केले, तर आर. प्रज्ञानंदला देशबांधव डी. गुकेशकडून पराभूत व्हावे लागले. पहिल्या फेरीतील चार सामने बरोबरीत सुटल्यानंतर दुसऱ्या फेरीतील चारही सामन्यांचा शनिवारी निकाल लागला. अव्वल मानांकित अमेरिकेच्या फॅबियानो काऊआनाने अझरबैजानच्या निजात आबासोव्हला आणि रशियाच्या इयान नेपोम्नियाचीने फ्रान्सच्या फिरोजा अलिरेझाला पराभूत करताना प्रभावी कामगिरी केली. महिला विभागात आर. वैशालीने पराभूत होण्याआधी चीनच्या झोंगी टॅनला जोरदार लढत दिली, तर रशियन अॅलेक्झांड्रा गोर्याचकिनाने युक्रेनियन अॅना मुझीचूकला नमविले. या विभागातील इतर सामन्यांमध्ये कोनेरू हम्पीने रशियाच्या कॅटेरिना लागनोसोबत आणि नुरग्युल सलीमोव्हाने चीनच्या टिनजी लेईसोबत बरोबरी साधली. गुजराथीसह काऊआना, नेपोम्नियाची आणि गुकेश प्रत्येकी 1.5 गुणांसह संयुक्तपणे आघाडीवर आहेत, तर नाकामुरा, प्रज्ञानंद, आबासोव्ह आणि अलिरेझा हे प्रत्येकी अर्ध्या गुणासह पाचव्या स्थानावर आहेत. महिलांच्या विभागात टॅन सलग दुसऱ्या विजयासह आघाडीवर असून गोर्याचकिना तिच्यापेक्षा अर्ध्या गुणाने मागे आहे. सलीमोव्हा, हंपी आणि लागनो एका गुणासह तिसऱ्या स्थानावर आणि लेई, वैशाली व मुझीचूक प्रत्येकी अर्ध्या गुणासह सहाव्या स्थानावर आहेत.









