शिवाजी सुंठकर यांचा सवाल : हलगा येथे आर. एम. चौगुले यांची प्रचारसभा
वार्ताहर /किणये
सुवर्ण विधानसौधसाठी हलगा-बस्तवाड या गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी प्रशासनाने घेतल्या. या दोन्ही गावातील तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणार, पाण्याची सोय करून देणार, गावांचा विकास करणार, अशी आश्वासने सरकारने दिली. मात्र जमिनी घेऊनही या गावांचा विकास झाला कोठे? असा सवाल माजी महापौर शिवाजी सुंठकर यांनी हलगा येथील आर. एम. चौगुले यांच्या प्रचारसभेत उपस्थित केला. महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार आर. एम. चौगुले यांची प्रचारसभा रविवारी सायंकाळी मरगाई गल्ली हलगा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी शिवाजी सुंठकर बोलत होते. ते पुढे म्हणाले, या सरकारने सीमाबांधवांना केवळ आश्वासने दिलेली आहेत. हलगा गावातील तरुणांना नोकऱ्या देणार, असे सांगितले होते. मात्र तसे झाले नाही. त्यामुळे सर्वांनी सावध होणे गरजेचे आहे. तुमच्या न्यायहक्कासाठी लढणाऱ्या समितीच्या उमेदवाराच्या पाठीशी ठामपणे उभे राहून चौगुले यांना विजयी करा, असे आवाहनही त्यांनी केले. सभेच्या अध्यक्षस्थानी धाकलु बेळगोजी हे होते. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन दिनेश ओऊळकर यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी अॅड. एम. जी. पाटील, अॅड. सुधीर चव्हाण, शुभम शेळके आदींनी उपस्थितांना मार्गदर्शन करून आर. एम. चौगुले यांना भरघोस मतदान करा आणि विधानसभेत समितीचा भगवा फडकवा, असे सांगितले. व्यासपीठावर लक्ष्मी मोरे, जीनाप्पा सामजी, अर्जुन वासोजी, प्रकाश मरगाळे, सुरेश बेळगोजी, मनोहर संताजी आदी उपस्थित होते. ग्रामीण भागात राष्ट्रीय पक्षाकडून विविध प्रकारची आमिषे दाखविण्यात येत आहेत. या आमिषांना बळी पडू नका, असेही नेतेमंडळींनी सांगितले. हलगा गावातील चौगुले यांना पाठिंबा दर्शविण्यात आला असून या सभेला महिलांची लक्षणीय गर्दी झाली होती. सूत्रसंचालन अनिल शिंदे यांनी केले









