तीन वरिष्ठ महिला अधिकाऱयांची नियुक्ती ः प्रकरणाचे संतप्त पडसाद कायम
चंदीगड / वृत्तसंस्था
चंदीगड विद्यापीठातील एका विद्यार्थिनीने वसतिगृहातील सहकारी विद्यार्थिनींचे आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल केल्यानंतर उमटलेले संतप्त पडसाद कायम आहेत. पंजाब सरकार आणि पोलीस यंत्रणेवर दबाव टाकण्यासाठी सोमवारीही विद्यार्थी, नातेवाईकांसह बऱयाच संस्था-संघटनांनी आंदोलन-निदर्शने केली. व्हिडीओ व्हायरल केल्याप्रकरणातील संशयित तरुणी, तिचा प्रियकर आणि त्यांच्या संपर्कातील अन्य एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. तसेच हे प्रकरण तरुणींशी संबंधित असल्याने पंजाब सरकारने ते विशेष तपास पथकाकडे (एसआयटी) सोपवले आहे. सदर एसआयटीमध्ये तीन वरिष्ठ महिला पोलीस अधिकाऱयांची नियुक्ती करण्यात आली असून त्याचे नेतृत्त्व आयपीएस अधिकारी गुरप्रीत कौर देव करणार आहेत.
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या सूचनेनुसार, चंदीगड विद्यापीठ प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आयपीएस अधिकारी गुरप्रीत कौर देव यांच्या देखरेखीखाली तीन सदस्यीय महिला एसआयटी स्थापन करण्यात आल्याचे पंजाबचे डीजीपी पंजाब गौरव यादव यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. तसेच अटक करण्यात आलेल्या संशयितांकडील सर्व इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त करून फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आली आहेत. एसआयटी या संपूर्ण प्रकरणाच्या तळापर्यंत पोहोचेल. यात सहभागी आढळल्यास कोणालाही सोडले जाणार नाही, असेही त्यांनी सांगितले. तपासाबाबत माहिती देतानाच पीडित विद्यार्थिनींसह सर्वांना शांतता आणि सलोखा राखण्याचे आवाहन त्यांनी केले. अफवांना बळी न पडता समाजात शांतता प्रस्थापित करण्यासाठी एकत्र काम करूया, असेही ते पुढे म्हणाले. तसेच या प्रकरणातील संबंधितांना अटक करण्यासाठी केलेल्या उत्कृष्ट सहकार्याबद्दल त्यांनी हिमाचल प्रदेशचे आभार मानले. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर 8 विद्यार्थिनींनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची चर्चा होती. मात्र, पोलिसांनी त्याचा पुन्हा एकदा इन्कार केला आहे.
संशयितांना 7 दिवस पोलीस कोठडी
आक्षेपार्ह व्हिडीओ बनवून व्हायरल केल्याप्रकरणी न्यायालयाने एका विद्यार्थिनीसह तीन जणांना 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपींच्या 10 दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती. अटक केलेल्यांचे फोन फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवले जातील. तसेच व्हिडीओ व्हायरल करणाऱयांचा शोध घेतला जाईल, असे पोलिसांनी न्यायालयाला सांगितले. प्राथमिक चौकशीत संशयितांनी व्हिडीओ चित्रीकरण केल्याची बाब मान्य केल्याची माहितीही न्यायालयाला देण्यात आली.
वसतिगृहाच्या दोन वॉर्डन निलंबित, अंतर्गत तपासासाठी 5 जणांची समिती
अश्लील व्हिडीओ प्रकरणानंतर चंदीगड विद्यापीठाने दोन वॉर्डनना निष्काळजीपणाच्या आरोपाखाली निलंबित केले आहे. विद्यापीठ प्रशासनाने पाच सदस्यांची समिती स्थापन केली असून, ही समिती सर्व घडामोडींचा अहवाल विद्यापीठ प्रशासनाला सादर करणार आहे. ही समिती विद्यार्थिनींच्या समस्याही ऐकून घेणार आहे. रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान वसतिगृहाच्या वॉर्डनला निलंबित करण्यात यावे, अशी मागणी आंदोलक विद्यार्थिनींनी केली होती. त्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने ही कारवाई केली आहे. दरम्यान, विद्यापीठ प्रशासनाने कॅम्पसमध्ये बाहेरील कोणत्याही व्यक्तीच्या प्रवेशावर बंदी घातली असून मीडियालाही कॅम्पसमध्ये प्रवेश दिला जात नाही.









