विमानतळ प्राधिकरणाच्या सूचनेनुसार बेळगाव विमानतळावर मॉक ड्रील
बेळगाव : बेळगाव विमानतळ परिसरात शुक्रवारी सकाळी प्रशिक्षणार्थी विमान पडल्याचे काही जणांच्या निदर्शनाला आले. काही तरुणांनी याचा व्हिडिओ करून समाज माध्यमांवर व्हायरल केला. त्यामुळे विमानतळाच्या एका बाजूला नागरिकांची प्रचंड गर्दी झाली होती. पोलीस, अग्निशमन विभाग, रुग्णवाहिका यांची धावपळ सुरू असल्याने मोठा अपघात झाल्याची चर्चा शुक्रवारी दिवसभर सांबरा, मुतगा परिसरात सुरू होती. विमानतळ प्राधिकरणाच्या सूचनेनुसार शुक्रवारी बेळगाव विमानतळावर मॉक ड्रील घेण्यात आले. चार दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीप्रमाणे अहमदाबादसारखी विमान दुर्घटना घडल्यास आपत्कालीन व्यवस्था कशा पद्धतीने कार्यरत राहील याची चाचणी घेण्यात आली.
त्यासाठी एक छोटे एअरक्राफ्ट तयार करून ते कोसळून अपघात झाल्याचे चित्र तयार करण्यात आले. त्यानुसार अग्निशमन, पोलीस व आरोग्य यंत्रणा कार्यान्वित झाली. विमान कोसळल्यानंतर मोठ्या प्रमाणात धूर झाल्याने रुग्णवाहिका एका मागून एक विमानतळात आल्या. विमानतळाचे अधिकारी धावत घटनास्थळी पोहोचत असल्याचे दिसून आल्याने बघ्यांची गर्दी वाढली. काहींनी तर विमानतळावर मोठा अपघात झाल्याचे व्हिडिओ काढून समाज माध्यमांवर व्हायरल केले. परंतु त्यानंतर हे मॉक ड्रील असल्याचे विमानतळ प्राधिकरणाकडून स्पष्ट करण्यात आले. या मॉक ड्रीलमध्ये विमानतळ प्राधिकरणाचे संचालक त्यागराज, साहाय्यक आयुक्त श्रवण नाईक,यांसह पोलीस वरिष्ठ अधिकारी व अग्निशमन विभागाचे अधिकारी उपस्थित होते. केएलई व इतर हॉस्पिटलनी मॉक ड्रीलसाठी सहकार्य केले.









