निर्बंध असतानाही कैद्याच्या हाती मोबाईल : कैद्याविरुद्ध एफआयआर दाखल
बेळगाव : शंभर वर्षे पूर्ण केलेले हिंडलगा येथील मध्यवर्ती कारागृह वेगवेगळ्या कारणांनी ठळक चर्चेत येत आहे. कारागृहातील एका कैद्याने तेथील गैरव्यवहार व भ्रष्टाचाराबद्दल व्हिडिओ करून तो माध्यमांना पाठविला आहे. या कैद्याविरुद्ध बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात एफआयआर दाखल केला आहे. कैद्याचा व्हिडिओ गुरुवारी एका खासगी वाहिनीवर प्रसारित झाला होता. शुक्रवारी कारागृहाचे साहाय्यक अधीक्षक शहाबुद्दीन के. यांनी दिलेल्या फिर्यादीवरून प्रशांत मोगवीर या कैद्याविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. उपलब्ध माहितीनुसार कुंदापूर येथील जिल्हा सत्र न्यायालयाने प्रशांत मोगवीर याला 22 फेब्रुवारी 2018 रोजी फाशीची शिक्षा ठोठावली आहे. तेव्हापासून कारवार मध्यवर्ती कारागृहातून त्याला हिंडलगा येथे हलविण्यात आले आहे. कारागृहात मोबाईल व इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या वापरावर निर्बंध असताना प्रशांतने कारागृहातील अधिकारी व कर्मचाऱ्यांबद्दल व्हिडिओ करून तो बाहेर पाठविला आहे. सोशल मीडियावर तो व्हिडिओ व्हायरल केल्याच्या आरोपावरून भादंवि 424 व कारागृह दुरुस्ती कायदा 42 अन्वये त्याच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. कारागृहात कैद्याच्या हातात मोबाईल येतो तरी कोठून? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांना याच कारागृहातील एका कैद्याने खंडणीसाठी धमकावल्याचे प्रकरण ताजे असतानाच या व्हिडिओ चित्रण प्रकाराने खळबळ माजली आहे. बेळगाव ग्रामीणचे प्रभारी पोलीस निरीक्षक विजयकुमार शिन्नूर पुढील तपास करीत आहेत.









