मणिपूरचा सलग दुसऱ्या सामन्यात पराभव, सामनावीर आदित्य सरवटे : सामन्यात 9 बळी व 69 धावा
वृत्तसंस्था/ अहमदाबाद
येथे सुरु असलेल्या रणजी चषक स्पर्धेत विदर्भाने आपल्या दुसऱ्या सामन्यात मणिपूरचा एक डाव व 90 धावांनी धुव्वा उडवला. पहिल्या सामन्यात सेनादलाला नमवल्यानंतर विदर्भाचा हा सलग दुसरा विजय आहे.
शुक्रवारी विदर्भाने मणिपूरचा पहिल्या डावात 75 धावात खुर्दा उडवला. यानंतर विदर्भने पहिल्या डावात 230 धावा करत 155 धावांची आघाडी घेतली. विदर्भसाठी अष्टपैलू खेळाडू आदित्य सरवटेने 69 धावांची खेळी साकारली. याशिवाय, गोलंदाजीतही त्याने 6 धावात 4 बळी टिपले. यानंतर दुसऱ्या डावात खेळताना मणिपूरच्या खेळाडूंनी सपशेल लोटांगण घातले. विदर्भाच्या भेदक माऱ्यासमोर त्यांचा दुसरा डाव 32 षटकांत 65 धावांवर आटोपला. करमजीतने सर्वाधिक 14 धावा केल्या. आदित्य सरवटेने दुसऱ्या डावातही अप्रतिम गोलंदाजी करत अवघ्या 10 धावांत 5 बळी घेतले. पहिल्या डावात 75 धावा करणारे मणिपूर दुसऱ्या डावात 65 धावात ढेर झाले. विदर्भाने एक डाव आणि 90 धावांनी सामना जिंकत सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली.
भुवनेश्वर 8 बळी, पश्चिम बंगाल सर्वबाद 188
कानपूर : भुवनेश्वर कुमारने रणजी ट्रॉफीमध्ये शानदार पुनरागमन केले आहे. बंगालविरुद्ध खेळल्या जात असलेल्या सामन्यात भुवीने 8 विकेट घेत खळबळ उडवून दिली आहे. उत्तर प्रदेशकडून खेळणाऱ्या भुवनेश्वरने 6 वर्षांनंतर रणजी ट्रॉफीमध्ये पुनरागमन करत पहिल्याच सामन्यात 8 विकेट्स घेण्याचा चमत्कार केला. भुवीने आपल्या शानदार गोलंदाजीमुळे यूपी संघाला सामन्यात परत आणले. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना उत्तर प्रदेशचा पहिला डाव अवघ्या 60 धावांत गारद झाला. प्रत्युतरात दाखल खेळताना बंगालचा पहिला डाव 188 धावांत आटोपला. भुवीने 22 षटकात 41 धावा देत 8 विकेट घेतल्या. भुवीशिवाय यश दयालने उर्वरित दोन विकेट घेतल्या. पहिल्या डावात 188 धावांत सर्वबाद झाल्यानंतरही बंगालने 128 धावांची आघाडी मिळवली आहे. दुसऱ्या डावात खेळताना उत्तर प्रदेशने बिनबाद 46 धावा केल्या असून अद्याप ते 82 धावांनी पिछाडीवर आहेत.









