17 वर्षाखालील तिरंगी क्रिकेट स्पर्धा

बेळगाव : युनियन जिमखाना आयोजित 17 वर्षाखालील मुलांच्या तिरंगी क्रिकेट स्पर्धेत उद्घाटन दिवशी युनियन जिमखाना संघाने बेंगळूर संघाचा 5 गड्याने तर विजय क्रिकेट अकादमीने पब्लिक स्कूल बेंगळूरचा 5 गड्यांनी पराभव करून विजयी सलामी दिली. अर्थव बेनके, स्वरुप साळुंखे यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला. युनियन जिमखाना मैदानावर आयोजित 17 वर्षाखालील तिरंग क्रिकेट स्पर्धेत युनियन जिमखाना, विजय क्रिकेट अकादमी, एनएचव्ही पब्लिक स्कूल बेंगळूर या तीन संघा दरम्यान ही स्पर्धा खेळविण्यात येत आहे. स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहूणे म्हणून जिमखाना अध्यक्ष चंद्रकांत बांडगी, बेंगळूरचे प्रशिक्षक विनोद एम. ए., सचिन साळुंखे, मिलिंद चव्हाण, समीर किल्लेदार, गौतम शेनवी, सुजित शिंदोळकर आदी मान्यवरांच्या उपस्थित यष्टीचे पुजन करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. पहिल्या सामन्यात एनएचव्ही पब्लिक स्कूल बेंगळूर संघाने प्रथम फलंदाजी करताना 25 षटकात 3 गडीबाद 166 धावा केल्या. त्यात आशितने 5 षटकार व 13 चौकारांसह 67 चेंडूत 106 धावा काढून स्पर्धेतील पहिले शतक झळकविले. त्याला प्रणितने 20 धावा करून सुरेख साथ दिली. प्रत्युत्तरादाखल खेळताना विजया क्रिकेट अकादमीने 21. 5 षटकात 5 गडीबाद 167 धावा करून सामना 5 गड्यांनी जिंकला. त्यात अर्थव बेनकेने 11 चौकारांसह 61 चेंडूत 79, आर्यन, मरूडकर व सार्थक पानारे यांनी प्रत्येकी 15 धावा केल्या. बेंगळूरतर्फे प्रत्येक्ष 2 गडीबाद केले. दुसऱ्या सामन्यात एनएचव्ही बेंगलोर संघाने प्रथम फलंदाजी करताना 25 षटकात 7 गडीबाद 146 धावा केल्या. त्यात मानसने 8 चौकारांसह 51, भार्गवने 3 चौकारांसह 19 धावा केल्या. जिमखानातर्फे स्वरूप साळुंखने 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना युनियन जिमखाना संघाने 21 षटकात 5 गडी बाद 150 धावा करून सामना 5 गड्यांनी जिंकला. त्यात साईराज साळुंखेने 2 षटकार, 5 चौकारासह 60, नमन व प्रतिक कराडे यांनी प्रत्येकी 32 धावा केल्या. बेंगळूरतर्फे अनिरूध्द जी ने 2 गडीबाद केले.









