अॅलकॅरेझ, अँडी मरे, रुने, फ्रिझ पुढील फेरीत
वृत्तसंस्था/ कॅलिफोर्निया (अमेरिका)
येथे सुरू असलेल्या इंडियन वेल्स पुरुष आणि महिलांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत महिलांच्या विभागात विद्यमान विजेती आणि टॉप सिडेड पोलंडची इगा स्वायटेक, ट्युनेशियाची जेबॉर, त्याचप्रमाणे रिबेकिना यांनी विजयी सलामीने आपल्या मोहिमेला प्रारंभ केला. दरम्यान स्पेनचा कार्लोस अॅलकॅरेझ, ब्रिटनचा माजी टॉप सिडेड अँडी मरे, डेन्मार्कचा रुने आणि अमेरिकेचा टेलर फ्रिझ यांनी पुरुष एकेरीची तिसरी फेरी गाठली.

महिला एकेरीच्या सामन्यात पोलंडच्या विद्यमान विजेत्या इगा स्वायटेकने अमेरिकेच्या क्लेरी लियूचा 6-0, 6-1 अशा सरळ सेट्समध्ये केवळ 60 मिनिटात फडशा पाडत दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळवला. ट्युनेशियाच्या जेबॉरने पोलंडच्या फ्रेच हिचा 4-6, 6-4, 6-1 असा पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळविले. हा सामना 100 मिनिटे चालला होता. दहाव्या मानांकित इलेना रिबेकिनाने तिसऱ्या फेरीत प्रवेश मिळवताना सोफिया किनेनचा 7-6(8-6), 7-6(7-5) असा पराभव केला.
पुरुषांच्या विभागात स्पेनच्या कार्लोस अॅलकॅरेझने टी. कोकिनाकीसचा 6-3, 6-3, ग्रिकस्पूरने पेलाचा 7-6(7-3), 7-6(7-4), रुमानियाच्या 19 वर्षीय होल्गेर रुनेने अमेरिकेच्या मॅकडोनाल्डचा 7-5, 6-3, अमेरिकेच्या टेलर फ्रिझने बेन शेल्टॉनचा 4-6, 6-4, 6-3 असा पराभव करत तिसऱ्या फेरीत स्थान मिळवले. ब्रिटनचा माजी टॉप सिडेड अँडी मरेने एकेरीची तिसरी फेरी गाठताना माल्डोव्हाच्या राडु अल्बॉटचा 100 मिनिटांच्या कालावधीत 6-4, 6-3 असा पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळवले. ब्रिटनच्या जॅक ड्रेपरने आपल्याच देशाच्या डॅनियल इव्हान्सवर 6-4, 6-2 अशी मात करत तिसरी फेरी गाठली. मरे आणि ड्रेप यांच्यात तिसऱ्या फेरीत गाठ पडणार आहे.









