वृत्तसंस्था/ ओमान
येथे शुक्रवारपासून सुरू झालेल्या महिलांच्या आशियाई हॉकी 5 एस विश्वचषक पात्र फेरीच्या स्पर्धेत भारतीय महिला हॉकी संघाने विजयी सलामी देताना मलेशियाचा 7-2 अशा गोलफरकाने पराभव केला.
या सामन्यात भारतातर्फे कर्णधार नवज्योत कौरने तिसऱ्या आणि 28 व्या मिनिटाला असे दोन गोल नोंदवले. अक्षता ढेकळेने चौथ्या मिनिटाला, मारियाना कुजूरने 17 व्या मिनिटाला, मोनिका दीपी टोप्पोने 12 आणि 20 व्या मिनिटाला असे दोन गोल तर महिमा चौधरीने 28 व्या मिनिटाला एक गोल केला. या सामन्यात भारताने मध्यंतरापर्यंत मलेशियावर 7-2 अशी भक्कम आघाडी मिळवली होती. मलेशियातर्फे वेन वेनने सातव्या मिनिटाला तर अझिझ झेफिराने 11 व्या मिनिटाला गोल केले. मात्र स्पर्धेच्या उत्तरार्धात उभय संघाकडून एकही गोल नोंदवला गेला नाही. आता या स्पर्धेत भारतीय महिला संघाचा पुढील सामना जपानबरोबर शनिवारी होत आहे.









