आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी : पाक-मलेशिया, जपान-कोरिया लढती बरोबरीत
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
चीनमध्ये रविवारी सुरु झालेल्या 2024 च्या आशियाई चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेत हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखाली भारतीय हॉकी संघाने विजयी सलामी देताना यजमान चीनचा 3-0 अशा गोलफरकाने पराभव केला. जपान व कोरिया आणि पाकिस्तान व मलेशिया यांच्यातील सामने बरोबरीत राहिले.
रविवारी झालेल्या या सामन्यात भारतातर्फे सुखजीत सिंग, उत्तम सिंग आणि अभिषेक यांनी प्रत्येकी 1 गोल नोंदविला. या स्पर्धेसाठी निवडण्यात आलेला भारतीय हॉकी संघ हा समतोल असून अलिकडेच भारताने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक मिळविले होते. भारतीय हॉकी संघाने सलग दोन ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये कांस्यपदक मिळविण्याचा विक्रम केला आहे. रविवारच्या सामन्यात 14 व्या मिनिटाला भारताचे खाते सुखजीत सिंगने उघडले. 27 व्या मिनिटाला उत्तम सिंगने भारताचा दुसरा गोल तर अभिषेकने 32 व्या मिनिटाला भारताचा तिसरा गोल नोंदविला. गेल्या वर्षी भारतीय हॉकी संघाने आपल्याच देशामध्ये झालेल्या या स्पर्धेचे जेतेपद मिळविले.
मलेशियाने पाकला 2-2 बरोबरीत रोखले
चीनमधील मोकी येथे चालू असलेल्या आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीमधील दिवसाच्या सुऊवातीच्या आणि गोलांचा वर्षाव झालेल्या सामन्यात कोरियाने जपानला 5-5 असे रोखून दाखविल्यानंतर मलेशियाने चुरशीच्या सामन्यात उशिरा मुसंडी मारत पाकिस्तानला 2-2 असे बरोबरीत रोखले.
नवनियुक्त मुख्य प्रशिक्षक ताहिर जहान यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या पाकिस्तानने पहिल्या सत्रात आक्रमक खेळ करत आपल्या मोहिमेची चांगली सुऊवात केली होती. मात्र मलेशिया त्यांच्या बचावात भक्कम राहिला. 24 व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर सुफियान खानने गोल केला आणि पाकिस्तानला 1-0 अशी महत्त्वपूर्ण आघाडी मिळवून दिली. त्यानंतर 32 व्या मिनिटाला झिकरिया हयातने अप्रतिम मैदानी गोल केला.
मात्र पाच मिनिटांनंतर पाकिस्तानच्या बचावात्मक त्रुटीमुळे त्यांना पेनल्टी कॉर्नरच सामना करावा लागला आणि अनुभवी फैजल सारी याने उत्कृष्ट गोल करून मलेशियाची पिछाडी 1-2 अशी कमी केली. अंतिम सत्र चुरशीचे राहून दोन्ही संघांनी तोडीस तोड खेळ केला. पाकिस्तानने आपल्या सर्व शक्तीनिशी 2-1 ही आघाडी राखली, पण मलेशियाच्ये आक्रमण पुढे वाढत गेले. त्यातच 45 व्या मिनिटाला फैझल कादिरला पिवळे कार्ड मिळाल्याने पाकिस्तानला एक खेळाडू कमी पडला. चार मिनिटे बाकी असताना मलेशियाने महत्त्वाचा पेनल्टी कॉर्नर मिळविला आणि पाकिस्तानी गोलरक्षक इश्तियाक अब्दुल्ला खान याला चमकविताना आयमान रोजमीने अचूक ड्रॅगफ्लिकसह गोल केला.









