वृत्तसंस्था/ रांची
शनिवारपासून येथे सुरु झालेल्या आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या महिलांच्या ऑलिम्पिक पात्र फेरीच्या स्पर्धेत जर्मनी आणि जपान यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यावर विजय नोंदवत विजयी सलामी दिली. ब गटातील सामन्यात जर्मनीने चिलीचा 3-0 तर अ गटातील सामन्यात जपानने झेक प्रजासत्ताकचा 2-0 असा फडशा पाडला.
जर्मनी आणि चिली यांच्यातील सामन्यात जर्मनीतर्फे सेलिन ओरुझने सातव्या मिनिटाला जेटी फ्लेसस्कूझने दहाव्या मिनिटाला तर लिसा नॉल्टीने 38 व्या मिनिटाला प्रत्येकी एक गोल नोंदवला. पाचव्या मानांकित जर्मनीचा हा चौदाव्या मानांकित चिलीवरील एकतर्फी विजय आहे. या सामन्यात शेवटपर्यंत चिलीला आपले खाते उघडता आले नाही. जर्मनीने सामन्यातील चौथ्या 15 मिनिटांच्या कालावधीत सलग तीन पेनल्टी कॉनर्स मिळविले पण त्यांना लाभ उठविता आला नाही.
जपानचा एकतर्फी विजय
या स्पर्धेतील शनिवारी खेळविण्यात आलेल्या दुसऱ्या सामन्यात माजी आशियाई चॅम्पियन्स जपानने विजयी सलामी देताना झेक प्रजासत्ताकचा 2-0 अशा गोलफरकाने पराभव केला. अ गटातील या सामन्यात जपानतर्फे मियु सुझुकीने चौथ्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर गोल केला. त्यानंतर 40 व्या मिनिटाला ओकिवाने जपानचा दुसरा गोल करून झेक प्रजासत्ताकचे आव्हान एकतर्फी संपुष्टात आणले. या सामन्यात जपानला एकूण 8 पेनल्टी कॉनर्स मिळाले. तर झेक प्रजासत्ताकला केवळ एकमेव पेनल्टी कॉनर मिळाला. आता या स्पर्धेत रविवारी जपानचा सामना जर्मनीबरोबर तर झेक प्रजासत्ताकचा सामना चिलीबरोबर होत आहे.









