वृत्तसंस्था/ कोलकाता
विजय हजारे करंडक वनडे क्रिकेट स्पर्धेत शनिवारी येथे झालेल्या सलामीच्या सामन्यात इशांत शर्मा आणि शिखर धवन यांच्या शानदार कामगिरीच्या जोरावर दिल्लीने विदर्भचा 5 गडय़ांनी पराभव केला. या स्पर्धेतील ब गटातील सामन्यात कर्नाटकाने मेघालयचा 115 धावांनी तर झारखंडने सिक्कीमचा 193 धावांनी पराभव केला.
दिल्ली आणि विदर्भ यांच्यातील सामन्यात प्रथम फलंदाजी करताना विदर्भचा डाव 47.2 षटकात 207 धावात आटोपला. गणेश सतीशने 45 धावा जमविल्या. दिल्लीच्या इशांत शर्माने 24 धावात 3 तर नवदीप सैनीने 64 धावात 3 गडी बाद केले. त्यानंतर दिल्लीने 44.5 षटकात 5 बाद 208 धावा जमवित विजय नोंदवला. शिखर धवनने 47 तर ललित यादवने नाबाद 56 धावा झोडपल्या.
ब गटातील सामन्यात प्रथम फलंदाजी करताना कर्नाटकाने 50 षटकात सर्व बाद 259 धावा जमवल्या. श्रेयस गोपालने 64, मयांक अगरवालने 15 धावा केल्या. मेघालयतर्फे अभिषेककुमारने 54 धावात 3 गडी बाद केले. त्यानंतर मेघालयचा डाव 46 षटकात 144 धावात आटोपला. सूर्या रायने 38 धावा जमविल्या. कर्नाटकाच्या श्रेयस गोपालने 21 धावात 3 बळी घेतले.
ब गटातील अन्य एका सामन्यात प्रथम फलंदाजी करताना झारखंडने 50 षटकात 3 बाद 309 धावा जमवल्या. विराट सिंगने 75 तर सौरभ तिवारीने नाबाद 63 धावा केल्या. सिक्कीमच्या लिपचाने 38 धावात 2 गडी बाद केले. त्यानंतर सिक्कीमचा डाव 40.1 षटकात 116 धावात आटोपला. सुमित सिंगने 31 धावा जमवल्या. झारखंडच्या राहुल शुक्लाने 19 धावात 5 गडी बाद केले.









