आयएमईआर चषक आंतरमहाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धा
बेळगाव : केएलई – आयएमईआर महाविद्यालय आयोजित आएमईआर चषक आंतरमहाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धेत उद्घाटन दिवशी अंगडी आयटी, जीआयटी, केएलई सिबाल्क, आरपीडी, व्हीएसएम निपाणी संघांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करत विजयी सलामी दिली. केएलई – आयएमईआर महाविद्यालय आयोजित आंतरमहाविद्यालयीन फुटबॉल चषक स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जीआयटी महाविद्यालयाचे प्राचार्य डी. ए. कुलकर्णी, आयएमईआरचे डायरेक्टर डॉ. आरिफ शेख, आयएमईआरचे स्पोर्ट्स समन्वयक डॉ. श्रीकांत नाईक, महाविद्यालयाचे क्रीडा निर्देशक जॉर्ज रॉड्रिग्ज, विजय रेडेकर, कौशिक पाटील, अखिलेश अष्टेकर, साहिल आंद्रे, साहिल व विवेक आदी उपस्थित होते. पाहुण्यांच्या हस्ते चेंडूला किंक करुन स्पर्धेची सुरुवात करण्यात आली.
पहिल्या सामन्यात अंगडी आयटी संघाने आयएमईआर संघाचा 1-0 असा निसटता पराभव केला. या सामन्यात पहिल्या सत्रात दोन्ही संघांनी गोल करण्यासाठी अनेक प्रयत्न केले. पण पहिल्या सत्रात गोल करण्यात अपयश आले. दुसऱ्या सत्रात 32 व्या मिनिटाला अंगडीच्या शुभम बोळगुंडीने गोल करुन 1-0 ची आघाडी मिळवून दिली. हाच गोल शेवटी निर्णायक ठरला. दुसऱ्या सामन्यात जीआयटी अ संघाने एसजीआय संघाचा 1-0 असा निसटता पराभव केला. या सामन्यात 18 व्या मिनिटाला जेआयटीच्या धनंजय सुळगेकरच्या पासवर सिल्वेस्टार परेराने गोल करुन 1-0 ची आघाडी मिळवून दिली. दुसऱ्या सत्रात दोन्ही संघांनी गोल करण्यासाठी अनेक प्रयत्न केले. पण यश आले नाही. तिसऱ्या सामन्यात केएलई सिबाल्क संघाने मराठा मंडळ अभियांत्रिकी महाविद्यालयाचा 1-0 असा पराभव केला. या सामन्यात दुसऱ्या सत्रात 19 व्या मिनिटाला केएलईच्या नजिम एम. ने गोल करुन 1-0 ची आघाडी मिळवून दिली. चौथ्या सामन्यात जैन बीबीए संघाने व्हीएसएम आयटी निपाणी ब संघाचा टायब्रेकरमध्ये 2-1 असा पराभव केला.
पाचव्या सामन्यात आरपीडी महाविद्यालयाने व्हीएसएम डिग्री महाविद्यालयाचा 1-0 असा पराभव केला. आरपीडी महाविद्यालयातर्फे ओम चव्हाणने निर्णायक गोल केला. सहाव्या सामन्यात व्हीएसएम आयटी निपाणी संघाने जेआयटी ब संघाचा 1-0 असा पराभव केला. निपाणीतर्फे आशिर्वाद शिंदेने एकमेव गोल केला. सातव्या सामन्यात जेआयटी अ व केएलई सिबाल्क संघांदरम्यान सामना झाला. हा सामना अतिशय अटीतटीचा झाला. दुसऱ्या सत्रात खेळ संपण्यास काही मिनिटे बाकी असताना केएलई सिबाल्का संघाचा ओमरुप चंदानीने मध्यापासून सरळ चेंडू गोलमुखात मारुन अप्रतिम गोल नोंदविला. 1 मिनिट बाकी असताना जेआयटीला पेनल्टी मिळाली. त्याचा फायदा घेत धनंजय सुळगेकरने गोल करुन 1-1 अशी बरोबरी करीत सामन्यात रंगत निर्माण केली. दोन्ही संघांचा गोलफलक समान झाल्याने पंचानी टायब्रेकर नियमाचा वापर केला. त्यामध्ये जेआयटीने 2-1 असा पराभव केला. जेआयटीतर्फे धनंजय सुळगेकर व सिल्वेस्टर परेरा यांनी गोल केले. तर केएलईतर्फे ओमरुप चंदानीने गोल केला. आठव्या सामन्यात आरपीडीने जैन बीसीएचा 2-0 अशा गोलफरकाने पराभव केला. आरपीडीतर्फे 17 व 35 व्या मिनिटाला ओम चव्हाणच्या पासवर विशाल रायमानेने सलग 2 दोल करुन 2-0 ची आघाडी मिळवून दिली.









