वृत्तसंस्था/ ऑकलंड, हॅमिल्टन
न्यूझीलंडमध्ये सुरू असलेल्या फिफाच्या महिलांच्या विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत शनिवारी झालेल्या विविध सामन्यात अमेरिकेने व्हिएतनामचा 3-0 अशा गोलफरकाने पराभव केला. तर दुसऱ्या सामन्यात जपानने झांबियाचे आव्हान 5-0 असे एकतर्फी संपुष्टात आणले.
अमेरिका आणि व्हिएतनाम यांच्यातील खेळवण्यात आलेल्या सामन्यात अमेरिकेच्या संघात पदार्पण करणारी सोफिया स्मिथने शानदार दोन गोल नोंदवले तर अॅलेक्स मॉर्गन हिने एक गोल केला. अमेरिकेने यापूर्वी दोनवेळा ही स्पर्धा जिंकली आहे. या स्पर्धेत प्रथमच खेळणाऱ्या व्हिएतनामला मात्र सलामीच्या सामन्यात बलाढ्या संघाकडून हार पत्करावी लागली. महिलांच्या विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेतील अमेरिकेचा हा सलग 13 वा विजय आहे. 2019 साली झालेल्या फिफाच्या महिलांच्या विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेतील सलामीच्या सामन्यात अमेरिकेने थायलंडचा 13-0 असा पराभव केला होता. या स्पर्धेत अमेरिकन संघाकडून 14 नवे फुटबॉलपटू खेळत आहेत. मध्यंतरापर्यंतच अमेरिकेने व्हिएतनामवर 2-0 अशी आघाडी मिळवली होती. 14 व्या मिनिटाला होरेनच्या पासवर स्मिथने अमेरिकेचे खाते उघडले त्यानंतर मध्यंतराला काही सेकंद बाकी असताना स्मिथने वैयक्तिक आणि संघाचा दुसरा गोल केला. सामन्याच्या उत्तरार्धात अलेक्स मॉर्गनने संघाचा तिसरा गोल नोंदवून व्हिएतनामचे आव्हान संपुष्टात आणले. या विजयामुळे अमेरिकेला तीन गुण मिळाले.
हॅमिल्टनमध्ये शनिवारी झालेल्या या स्पर्धेतील अन्य एका सामन्यात जपानने झांबियाचा 5-0 अशा गोलफरकाने दणदणीत पराभव करत विजयी सलामी दिली. जपानतर्फे हिनाता मियाझेवाने दोन गोल तर मीना तेनाका आणि जून एंडो यांनी प्रत्येकी एक गोल केला. जपानच्या मियाझेवाचे या स्पर्धेत पदार्पण झाले असून तिने पहिल्याच सामन्यात दोन गोल केले. या सामन्यातील विजयामुळे जपानने क गटात सरस गोलसरासीच्या जोरावर स्पेनला मागे टाकत आघाडीचे स्थान मिळवले आहे. जपानला या विजयामुळे तीन गुण मिळाले. आता या स्पर्धेत ड्युनेडीन येथे नेदरलँड्स आणि पोर्तुगाल यांच्यात सामना खेळवला जाणार आहे. अमेरिकेचा या स्पर्धेतील पुढील सामना येत्या गुरुवारी वेलिंग्टनमध्ये नेदरलँड्स बरोबर होईल.









