पावले चषक यू-15 निमंत्रितांची क्रिकेट स्पर्धा
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव ग्रामीण क्रिकेट अकादमी आयोजित 15 वर्षाखालील निमंत्रितांच्या पावले चषक स्पर्धेत उद्घाटनाच्या सामन्यात एम्स क्रिकेट अकादमी सावंतवाडी संघाने बेळगाव ग्रामीण संघाचा 197 धावांनी पराभव करून विजयी सलामी दिली. 108 धावा करणाऱया इशांत कुबडेला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
फिनिक्स स्कूल होनगा येथे आयोजित या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी युवराज पावले, सरफूनीसा सुभेदार, अलका पाटील, जोसेफ परेरा, राहुल मुंदरा, ऋषभ मुंदरा, संदीप कांबळे, नागेश भोसले, विजयकुमार तोरगल, महांतेश गवी, सुनील देसाई, पृथ्वी पावशे, अरूण कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते. पाहुण्यांच्या हस्ते यष्टीचे पूजन करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.
एम्स पेकेट अकादमी सावंतवाडी संघाने 20 षटकात 6 बाद 264 धावा केल्या. त्यात इशांत कुबडेने 13 चौकार 2 षटकारासह 108 धावा करून शतक झळकाविले. यश पाटकरने 27 धावा केल्या. बेळगाव ग्रामीणतर्फे सुमित भोसलेने 44 धावात 3, अमिरूल हसन, रूदेश धामण्णावर, मोहम्मद इस्माईल यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना बेळगाव ग्रामीण संघाचा डाव 14 षटकात सर्व बाद 65 धावात आटोपला. त्यात समर्थ किल्लेकरने 2 षटकार 3 चौकारासह 25 धावा केल्या. सावंतवाडीतर्फे उस्मा खानने 16 धावात 5, रूदेश कर्णिक व पराग अरबेकर यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. सामन्यानंतर प्रमुख पाहुणे बाळू कांबळे यांच्या हस्ते इशांत कुबडेला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.









