वृत्तसंस्था /वॉशिंग्टन
एटीपी टूरवरील येथे सुरू असलेल्या डी सी खुल्या पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत ब्रिटनचा माजी टॉप सिडेड अँडी मरे तसेच अमेरिकेचा टेलर फ्रिट्झ यांनी एकेरीत शानदार विजयी सलामी दिली. मरेच्या सामन्यावेळी त्याचे चाहते मोठ्या संख्येने उपस्थित होते. महिलांच्या विभागात अमेरिकेच्या कोको गॉफने विजयी सलामी दिली. बुधवारी या स्पर्धेतील खेळवण्यात आलेल्या पहिल्या फेरीतील सामन्यात अँडी मरेने अमेरिकेच्या ब्रेन्डॉन नाकाशिमाचा 7-6 (7-5), 6-4 असा पराभव करत विजयी सलामी दिली. 2018 नंतर वॉशिंग्टनमधील या स्पर्धेत मरेचा हा पहिला विजय आहे. मरेचा पुढील फेरीतील सामना अमेरिकेच्या टॉप सिडेड टेलर फ्रिट्झ बरोबर होणार आहे. टेलर फ्रिट्झने पहिल्या फेरीतील सामन्यात आपल्याच देशाच्या वॅझेडाचा 6-3, 6-3 असा फडशा पाडला. 36 वर्षीय मरेच्या या सामन्यावेळी त्याचे चाहते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कॅनडाच्या अॅलिसिमेला जपानच्या वाटानुकीकडून हार पत्करावी लागली. वाटानुकीने हा सामना 7-6(10-8), 7-6(7-3) असा जिंकला. ऑस्ट्रेलियाच्या थॉम्सनने सातव्या मानांकित मॅनेरिनोचा 7-5, 6-4, अकराव्या मानांकित यु बँक्सने शिमाबुकुरोचा 6-3, 6-4, फ्रान्सच्या मोनफिल्सने बुबलिकचा 6-3, 6-4 असा पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळविले. महिला एकेरीच्या सामन्यात अमेरिकेच्या सातव्या मानांकित कोको गॉफने अमेरिकेच्या हेली बॅप्टीस्टीचा 6-1, 6-4 असा पराभव केला. या विजयामुळे गॉफने एकेरी उपांत्य फेरी गाठली आहे. 15 व्या मानांकित बेन्सिकने अमेरिकेच्या लॉरेन डेव्हिसचा 6-1, 6-4, युक्रेनच्या स्विटोलिनाने रशियाच्या कॅसेटकिनाचा 6-2, 6-2 असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरी गाठली.









