चेन्नईचा पहिल्याच सामन्यात पराभव, रशिद खान सामनावीर
वृत्तसंस्था / अहमदाबाद
2023 च्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेत येथे शुक्रवारी नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये झालेल्या सलामीच्या सामन्यात शुभम गिलच्या शानदार अर्धशतकाच्या जोरावर तसेच सामनावीर रशिद खानच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर विद्यमान विजेत्या गुजरात टायटन्सने धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपरकिंग्जचा 5 गड्यांनी पराभव करत आपल्या मोहिमेला शानदार प्रारंभ केला आहे. ऋतुराज गायकवाडचे अर्धशतक वाया गेले.
या सामन्यात गुजरात टायटन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. चेन्नईने 20 षटकात 7 बाद 178 धावा जमविल्या. त्यानंतर गुजरात टायटन्सने 19.2 षटकात 5 बाद 182 धावा जमवित हा सामना 4 चेंडू बाकी ठेवून 5 गड्यांनी जिंकला.

चेन्नई सुपरकिंग्जच्या डावामध्ये गतवर्षीप्रमाणेच सलामीचा फलंदाज ऋतुराज गायकवाडची फलंदाजी पहिल्या सामन्यापासूनच बहरत असल्याचे दिसून आले. गेल्या वर्षी त्याने आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक धावा जमविल्या होत्या. शुक्रवारच्या सामन्यात गायकवाडने तुफान फटकेबाजी करताना 50 चेंडूत 9 षटकार आणि 4 चौकारांसह 92 धावांची खेळी केली. मात्र, त्याला सहकाऱ्यांकडून पुरेशी साथ मिळाली नाही. मोईन अलीने 17 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारांसह 23, अम्बाती रायडूने 12 चेंडूत 1 षटकारासह 12, शिवम दुबेने 18 चेंडूत 1 षटकारासह 19 तर आठव्या क्रमांकावर फलंदाजीस आलेला कर्णधार धोनीने 7 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारासह नाबाद 14 धावा जमविल्या. गुजरात टायटन्सतर्फे मोहम्मद शमीने तसेच रशिद खान आणि जोसेफ यांनी प्रत्येकी 2 गडी तर लिटलने 1 बळी मिळविला. रशिद खानने आपल्या चार षटकात 26 धावा दिल्या. गुजरात टायटन्सच्या मोहम्मद शमीने आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आपले बळींचे शतक पूर्ण केले. चेन्नईच्या डावामध्ये 13 षटकार आणि 10 चौकार नोंदविले गेले.

मोहम्मद शमीचे बळींचे शतक
शुक्रवारच्या सामन्यात शमीने सलामीचा फलंदाज कॉनवेचा त्रिफळा उडवून आपला शंभरावा बळी नोंदविला. 2023 च्या आयपीएल हंगामातील शमीचा हा पहिला बळी म्हणून ओळखला जाईल. आयपीएल स्पर्धेत बळींचे शतक पूर्ण करणारा शमी हा 19 वा गोलंदाज आहे. या स्पर्धेत चेन्नई सुपरकिंग्जकडून यापूर्वी खेळणाऱ्या ड्वेन ब्राव्होने 161 सामन्यात 8.38 धावांच्या सरासरीने सर्वाधिक म्हणजे 183 बळी मिळविले आहेत. त्यानंतर लंकेचा लसिथ मलिंगा दुसऱ्या स्थानावर असून त्याने 122 सामन्यात 7.14 धावांच्या सरासरीने 170 बळी मिळविले आहेत. मलिंगा या स्पर्धेत तब्बल दहा वर्षे मुंबई इंडियन्स संघाकडून खेळत होता. 32 वर्षीय फिरकी गोलंदाज यजुवेंद्र चहलने 131 सामन्यात 7.61 धावांच्या सरासरीने 166 बळी नोंदवित तिसरे स्थान मिळविले आहे.

प्रत्युत्तरादाखल खेळताना गुजरात टायटन्स संघातील सलामीचा फलंदाज शुभमन गिलने 36 चेंडूत 3 षटकार आणि 6 चौकारांसह 63 धावा झोडपताना सलामीच्या साहासमवेत 23 चेंडूत 37 धावांची भागीदारी केली. साहाने 16 चेंडूत 2 षटकार आणि 2 चौकारांसह 25 धावा जमविल्या. साहा बाद झाल्यानंतर साई सुदर्शनने गिलला बऱ्यापैकी साथ दिली. या जोडीने दुसऱ्या गड्यासाठी 63 धावांची भागीदारी केली. सुदर्शनने 17 चेंडूत 3 चौकारांसह 22 धावा जमविल्या. कर्णधार हार्दिक पांड्या जडेजाच्या गोलंदाजीवर स्वीपचा फटका मारण्याच्या नादात त्रिफळाचीत झाला. त्याने 11 चेंडूत 8 धावा जमविल्या. गिल चौथ्या गड्याच्या रूपात तंबूत परतला. विजय शंकर आणि तेवातिया यांनी आपल्या संघाला विजयाच्या समीप नेले. 18 व्या शतकात विजय शंकर हंगिरगेकरच्या गोलंदाजीवर सँटेनरकरवी सीमारेषेजवळ झेलबाद झाला. त्याने 21 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह 27 धावा जमविल्या. तेवातिया आणि रशिद खान या जोडीने आपल्या संघाला 4 चेंडू बाकी असताना विजय मिळवून दिला. तेवातियाने 14 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारासह नाबाद 15 तर रशिद खानने 3 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारासह नाबाद 10 धावा जमविल्या. चेन्नईतर्फे राजवर्धन हंगिरगेकरने 36 धावात 3 तर रविंद्र जडेजा आणि तुषार देशपांडे यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. गुजरातच्या डावामध्ये 8 षटकार आणि 15 चौकार नोंदविले गेले. या सामन्यात साई सुदर्शनने इम्पॅक्ट प्लेअर कसा असावा, याची जाणीव करून दिली. डावातील 13 व्या षटकात केन विलियम्सन जखमी झाल्याने त्याच्या जागी गुजरात टायटन्सने साई सुदर्शनला संधी दिली होती. गुजरात टायटन्सला शेवटच्या षटकामध्ये विजयासाठी 8 धावांची जरुरी होती. विजय शंकर बाद झाल्यानंतर फलंदाजीस आलेल्या अष्टपैलू रशिद खानने तुषार देशपांडेच्या पहिल्याच चेंडूवर उत्तुंग षटकार खेचला. त्यानंतर पुढील चेंडूवर त्याने चौकार ठोकून आपल्या संघाला शानदार विजय मिळवून दिला.
संक्षिप्त धावफलक
चेन्नई सुपरकिंग्ज 20 षटकात 7 बाद 178 (ऋतुराज गायकवाड 92, मोईन अली 23, रायडू 12, शिवम दुबे 19, धोनी नाबाद 14, शमी 2-29, रशिद खान 2-26, अल्झेरी जोसेफ 2-33, लिटल 1-41), गुजरात टायटन्स 19.2 षटकात 5 बाद 182 (शुभमन गिल 63, साहा 25, साई सुदर्शन 22, हार्दिक पांड्या 8, विजय शंकर 27, तेवातिया नाबाद 15, रशिद खान नाबाद 10, राजवर्धन हंगिरगेकर 3-36, देशपांडे 1-51, जडेजा 1-28).









