प्रतिनिधी,कोल्हापूर
Shivaji University Kolhapur : शिवाजी विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेच्या तीन जागांसाठी शनिवारी मतदान झाले. यामध्ये शिवाजी विद्यापीठ विकास आघाडीच्या तिन्ही उमेदवारांनी बाजी मारली. व्यवस्थापन परिषदेवर डॉ. जगदीश सपकाळे २६ तर डॉ. वर्षा मैंदर्गी २९ मतांनी तर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळावर प्राचार्य अर्जुन जाधव २७ मतांनी विजयी झाले. निकालानंतर विजयी उमेदवारांसह आघाडीच्या नेत्यांनी विद्यापीठातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करून अभिवादन करीत आनंदोत्सव साजरा केला. डॉ. संजय डी. पाटील यांनी विजयी उमेदवारांना पुष्पगुच्छ देवून अभिनंदन केले.
शिवाजी विद्यापीठ विकास आघाडीच्या डॉ. जगदीश सपकाळे यांच्या विरुद सुटाने डॉ. सुनील चव्हाण होते. यामध्ये डॉ. सपकाळ यांना २६ तर डॉ. चव्हाण यांना १६ मते मिळाल्याने सपकाळ १० मतांनी निवडून आले. महिला गटामध्ये विद्यापीठ विकास आघाडीच्या डॉ. वर्षा गेंदर्गी यांच्या विरूध्द सुटाच्या डॉ रूपाली संकपाळ होत्या. यामध्ये डॉ. मैंदर्गी यांना २९ तर डॉ. संपाकळ यांना १२ मते मिळाल्याने मेंदर्गी १७ मतांनी निवडून आल्या. तसेच विद्या परिषदमधून महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळासाठी प्राचार्य अर्जुन जाधव विरूध्द सुटाच्या डॉ. रूपाली संकपाळ होत्या.
यामध्ये प्राचार्य जाधव यांना २७ तर संकपाळ यांना १५ मते मिळाल्याने जाधव १२ मतांनी निवडून आले. यंदाही व्यवस्थापन परिषदेच्या तिन्ही जागेवर विद्यापीठ विकास आघाडीच्या उमेदवारांनी विजय मिळवला. विद्या परिषदेवर विकास आघाडीची सदस्य संख्या लक्षणीय असल्याने त्यांना ज्यादा मताधिक्याने विजय अपेक्षित होता. मात्र विकास आघाडीची चार ते पाच मते सुटा संघटनेच्या उमेदवारांना मिळाल्याची चर्चा विद्यापीठ वर्तुळात आहे. निवडणूकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यापीठ विकास आघाडीचे डॉ. संजय डी. पाटील, डॉ. क्रांतिकुमार पाटील, डॉ. व्ही. एम. पाटील, प्रताप उर्फ भैय्या माने, डॉ. डी. आर. मोरे, संजय जाधव, डॉ. मंजिरी मोरे, डॉ. निशा पवार, विनोद पंडीत, डॉ. रघुनाथ ढमकले आदींनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन करीत शुभेच्छा दिल्या.