वृत्तसंस्था/बटुमी, जॉर्जिया
भारताची कोनेरू हंपी बुधवारी येथे झालेल्या फिडे महिला विश्व बुद्धिबळ चषकाच्या दुसऱ्या फेरीत उझबेकिस्तानच्या अफऊझा खामदामोवाविऊद्ध काळ्या सोंगाट्यांसह खेळताना विजय मिळवून पुढील फेरीच्या जवळ पोहोचली, तर उदयोन्मुख प्रतिभावान खेळाडू वंतिका अग्रवालने माजी विजेत्या अॅना उशेनिनाचा पराभव केला. गेल्या दशकाहून अधिक काळापासून उच्च दर्जाचा बुद्धिबळ खेळणाऱ्या ग्रँडमास्टर हंपीने खामदामोवाविऊद्ध ओपन ऊई लोपेझचा वापर केला आणि शेवटच्या टप्प्यात जरी बरोबरीची स्थिती निर्माण झाली असली, तरी उझबेकिस्तानची खेळाडू हंपीचा दबाव पेलू शकली नाही. खामदामोवाने एक मोहरा चुकवला आणि नंतर हंपीसाठी तो सोपा प्रवास ठरला. दुसरीकडे, वंतिकाने उशेनिनाला पराभूत करताना तिचे रणनीतिक कौशल्य प्रभावीपणे दाखवले.
क्वीन-पॉन ओपनिंगनंतरचा मधला टप्पा संतुलित होता, परंतु वंतिकाने नंतर बाजी मारली आणि युक्रेनियन ग्रँडमास्टरला धक्का दिला. इतर भारतीयांमध्ये डी. हरिकाला कठोर परिश्रम करावे लागले, परंतु तिने सहकारी पी. व्ही. नंदीधाला हरवले. पद्मिनी राऊतनेही तिची सर्वोत्तम कामगिरी चालू ठेवत आणखी एक माजी विश्वविजेती अलेक्झांड्रा कोस्टेनियुकसोबतचा सामना बरोबरीत सोडविला. भारतीय संघातील दुसरी मोठी आशा असलेल्या आर. वैशालीनेही सकारात्मक सुऊवात केली. तिने कॅनडाच्या ओएलेट मॅली-जेडला हरवले. जॉर्जियाच्या केसरिया म्गेलाडझेवर विजय मिळवणाऱ्या दिव्या देशमुखनेही सकारात्मक सुऊवात केली, तर के. प्रियांकाने आपल्या प्रतिष्ठेला जागत आपल्याहून वरच्या क्रमांकावरील पोलंडच्या क्लाउडिया कुलोनसोबतचा सामना बरोबरीत सोडविला. शुक्रवारी परतीचे सामने होतील.









