प्रतिनिधी,कोल्हापूर
Mahadevrao Mahadik News : कसबा बावडा येथील श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना निवडणुकीत माजी आमदार अमल महाडिक यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी छत्रपती शाहू सहकार आघाडीने मंगळवारी विजयी षटकार खेचला. तर आमदार सतेज पाटील यांच्या परिवर्तन आघाडीला तिसऱ्यांदा व्हाईट वॉश देत कारखान्यातील सत्ता कायम राखली. निवडणुकीत आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू परिवर्तन आघाडीच्या सर्व 21 उमेदवारांचा सरासरी पंधराशे ते दोन हजारच्या मताधिक्याने पराभव केला. माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी संस्था गटातून 128 पैकी 84 मते घेत विजयी सलामी दिली. प्रतिष्ठतेची निवडणुकीत महाडिक गटाने आमदार सतेज पाटील यांच्या परिवर्तन आघाडीचा कंडका पाडला.
छत्रपती राजराम कारखाना निवडणुकीसाठी सुरु असलेली रणधुमाळी खऱ्या अर्थाने मंगळवारी मतमोजणीनंतर शांत झाली. रमणमळा येथील शासकीय बहुउद्देशीय हॉल येथे मंगळवारी सकाळी आठ वाजता मतमोजणी प्रक्रीयेला सुरूवात झाली. मतपेटीतील मतपत्रिकांचे विभाजन झाल्यानंतर पाऊणे दहा वाजता प्रत्यक्षात मतमोजणीला सुरवात झाली. पाऊणे अकरा वाजण्याच्या सुमारास पहिल्या फेरीतील उत्पादक गट क्रमांक एकची मतमोजणी समोर आली. यामध्ये महाडिक गटाच्या उमेदवारांनी सुमारे आठशे मतांची आघाडी घेतली. हातकणंगले आणि करवीर तालुक्यातील काही गावातील मतांची ही फेरी असल्याने येथील मताधिक्य निर्णायक ठरले. यानंतर दुपारी दोन वाजता सुरु झालेल्या दुसऱ्या फेरीत आमदार सतेज पाटील यांच्या परिवर्तन आघाडीला मताधिक्य मिळेल अशी अपेक्षा आमदार पाटील गटाला होती. मात्र दूसऱ्या फेरीतही महाडिक गटाने बाजी मारत आठशे ते हजारचे मताधिक्य मिळविले.
संस्था गटातून महादेवराव महाडिक विजयी
संस्था गटातील मतमोजणीस दुपारी दोन वाजता सुरवात झाली. या गटाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष असल्याने मतमोजणी सुरु असलेल्या टेबलवर दोन्ही बाजूच्या समर्थकांनी गर्दी केली. यामध्ये सत्ताधारी आघाडीचे उमेदवार माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी 128 पैकी 83 तर विरोधी आघाडीचे उमेदवार सचिन पाटील यांना 44 मते मिळाली. तर एक मत बाद ठरले. माजी आमदार महाडिक यांनी 39 मतांनी विजयी मिळविला.
कसबा बावड्यातून महाडिकांना दिलासा
कसबा बावडा, पुलाची शिरोली येथे सर्वाधिक मतदान होते. बावड्यातून सतेज पाटील गटाला मोठे मताधिक्य मिळेल अशी अपेक्षा होती. पण कसबा बावड्यात सतेज पाटील गटाला सरासरी 605 तर महाडिक गटाला 310 इतके मतदान मिळाले. हे मतदान महाडिक गटाला दिलासा देणारे होते. तर पुलाची शिरोली येथे महाडिक गटाला सरासरी 714 तर पाटील गटाला 127 मते मिळाली. त्यामुळे महाडिक गटाला पुलाची शिरोलीसह कसबा बावड्याचीही साथ मिळाली.
कुंभीचा फटका, 21 चा झटका
करवीर तालुक्यातील कुंभी-कासारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत आमदार सतेज पाटील यांनी माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्या पॅनेलला पाठींब दिला होता. याचा फटका आमदार पाटील यांनी राजाराम कारखान्याच्या निवडणुकीत बसला. राजाराम कारखाना निवडणुकीत आमदार पी. एन. पाटील यांचा प्रभाव असणाऱ्या गावांचा समावेश होता. या गावांमधून आमदार पाटील गटाला अपेक्षित मताधिक्य मिळाले नाही. करवीरमधूनही आमदार पाटील यांचे पॅनेल मागे पडल्यानंतर आमदार पी. एन. पाटील यांनी कुंभीचा फटाका, 21 झटका असे स्टेटस लावत अप्रत्यक्षरित्या कुंभीच्या निवडणुकीतील वचपा काढल्याचे जाणवून दिले.
मी शेलार मामा, नाद करु नका, सर्वसमान्य सभासदांचा विजय आहे. धनंजय महडिक आणि अमल महाडिक यांना विजयाचे श्रेय देते. हा गरीब शेतकऱ्यांचा श्रीमंत कारखाना आहे. कोल्हापूर जिह्याच्या राजकारणाल वेगळी दिशा मिळेल. आमदार विनय कोरे, आमदार प्रकाश आवाडे, माजी खासदार निवेदीता माने यांनी विशेष सहकार्य केले. मी शेलार मामा आहे. माझ्या नादाला लागू नका. माझ्या जवळपासही विरोधक येवू शकत नाहीत, अगोदर धनंजय आणि अमल यांच्याशी लढा, मी तर तुम्हाला फुकून टाकीन.
माजी आमदार महादेवराव महाडिक
विजयी घोडदौड कायम राहील
सभासदांनी महादेवराव महाडिक यांचे नेतृत्व मान्य केले. या निवडणूकीत सत्ताधारी आघाडीला मदत आणि सहकार्य करणारे आमदार विनय कोरे, आमदार प्रकाश आवाडे, खासदार धैर्यशिल माने, माजी खासदार निवेदिता माने, आमदार राजेंद्र पाटील- यड्रावकर, माजी खासदार राजू शेट्टी यांचे मनापासून आभार मानतो. हा ऐतिहासिक विजय 122 गावातील शेतकरी सभासदांचा असून, यापुढे कोल्हापूर जिल्हयात भाजप आणि महाडिक गटाची विजयी घोडदौड कायम राहील.
खासदार धनंजय महडिक
सभासदांनी यावेळीही विरोधकांना नाकारले
मागील 27 वर्षापासून माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्यावर जो सभासदांनी विश्वास दाखवला तोच विश्वास आमच्यावरही दाखवला. प्रचारात सभासदांना दिलेल्या आश्वासनांची येत्या काळात पूर्तता करु. हा खरा विजय सभासदांचा आहे. सभासदांनी सहकाराला साथ दिली याचा मनस्वी आनंद आहे. सतेज पाटील हे मागील तीन निवडणुकांपासून कारखाना ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र त्यांना सभासदांनी नाकारले आहे. पुढील निवडणुकीत त्यांनी याचा विचार करुन आमच्या विरोधात लढावे.
माजी आमदार अमल महाडिक
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








