रशियाच्या दौऱ्यावर जाणार पंतप्रधान
वृत्तसंस्था/ मॉस्को
रशियाने पंतप्रधान नरेंद्र मोदींना 9 मे रोजी होणाऱ्या 80 व्या व्हिक्ट्री डे परेड सोहळ्यात सामील होण्यासाठी आमंत्रित केले आहे. रशियाचे उपविदेशमंत्री आंद्रेई रुडेंको यांनी यासंबंधी माहिती दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यंदाच्या विजय दिन संचलन सोहळ्यात सामील होतील अशी रशियाला आशा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान मोदींना आमंत्रण देण्यात आले असून त्यांच्या या दौऱ्यावर काम केले जात असल्याचे रुडेंको यांनी सांगितले आहे. रशियाने यंदाच्या विजय दिन संचलन सोहळ्यात अनेक मित्रदेशांच्या नेत्यांना आमंत्रित केले आहे. जानेवारी 1945 मध्ये सोव्हियत सैन्याने जर्मनीच्या विरोधात आक्रमण सुरू केले होते. 9 मे रोजी जर्मनीच्या कमांडर-इन-चीफने विनाशर्त आत्मसमर्पणाच्या करारावर स्वाक्षरी केली, याचबरोबर दुसरे महायुद्ध संपुष्टात आले होते. रशिया याचमुळे 9 मे रोजी विजय दिन साजरा करत असतो.
पंतप्रधान मोदींनी जुलै 2024 मध्ये रशियाचा दौरा केला होता, जवळपास 5 वर्षांमध्ये त्यांचा हा पहिलाच दौरा होता. त्यापूर्वी त्यांनी 2019 मध्ये रशियाच्या ब्लादिवोस्तोक शहराचा दौरा केला होता. या शहरात आयोजित एका आर्थिक संमेलनात मोदींनी भाग घेतला होता.
पंतप्रधान मोदींनी देखील रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांना भारत दौऱ्यावर येण्याचे निमंत्रण दिले आहे. पुतीन यांनी पंतप्रधान मोदींचे निमंत्रण स्वीकारले आहे, परंतु त्यांच्या भारत दौऱ्याच्या तारखा अद्याप जाहीर करण्यात आलेल्या नाहीत. पुतीन आणि मोदी यांच्यात नियमित स्वरुपात संपर्क असतो. दोन्ही नेते दर काही महिन्यांनी फोनवरुन संपर्क साधत असतात तसेच आंतरराष्ट्रीय संमेलनांदरम्यान त्यांच्या गाठीभेटी होत असतात.









