बघता बघता क्रिकेटच्या महाकुंभमेळ्याचे 40 ते 42 दिवस कसे निघून गेले ते समजलेच नाहीत. त्यातच निम्मे दिवस भारताचा आनंदोत्सव साजरा करण्यात गेले. या पूर्ण विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने सर्व संघाचा जवळपास मागचा हिशोब पूर्ण केला. सर्वप्रथम सालाबादप्रमाणे पाकिस्तानचा, त्यानंतर बांगलादेश, आणि सरते शेवटी ज्या न्यूझीलंडने मागच्या विश्वचषक स्पर्धेत भळभळती जखम दिली होती त्या न्युझीलंडचा हिशोब पूर्ण केला.
आता ही विश्वचषक स्पर्धा परमोच्च क्षणापर्यंत येऊन पोहोचली आहे. या विश्वचषक स्पर्धेत प्रत्येक प्रश्नाचे रोखठोक उत्तर भारतीय संघाने दिले आहे. आता फक्त भारतीय संघाचा एक विजय करोडो भारतीयांना गगनात न मावणारा आनंद देऊन जाणार आहे. गंमत बघा, काय योगायोग आहे भारतीय संघाचा या विश्वचषक स्पर्धेत, लीग सामन्यात सुरुवात कांगारू विरुद्ध आणि स्पर्धेचा शेवटही कांगारू विरुद्धच. मी वरती म्हटल्याप्रमाणे जवळपास सर्व संघांचा हिशोब भारतीय संघाने केला आहे. आता वेळ आहे ती ऑस्ट्रेलियाची. 2003 मधील अंतिम सामन्यातील पराभवाचे उट्ठे काढण्याची. (अर्थात त्या सामन्यात भारताने काही चुकाही केल्या होत्या हे विसरून चालता येणार नाही)
विश्वचषक स्पर्धेत विश्वचषक विजेतेपदाच 1983 मध्ये लॉर्ड्स वर पहिलं पाऊल टाकलं ते कपिलदेव यांनी. त्यानंतर तब्बल 28 वर्षानंतर महेंद्रसिंग धोनीने मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर षटकार खेचत दुसरे पाऊल टाकलं. आणि आता वेळ आहे ती अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियम वरती मुंबईकर (बोरिवलीचा) रोहित शर्माची. न्युझीलंडविरुद्धचा सेमी फायनलचा सामना मात्र ख्रया अर्थाने ठशामी फायनलठहोता. ही स्पर्धा सुरू होण्या अगोदर शुभमन गिल डेंग्यूचा शिकार झाला. स्पर्धेच्या मध्यंतराला हार्दिक पंड्या जखमी झाला. परंतु याचा कुठलाही फरक भारतीय संघावर पडला नाही. एका दृष्टीने ही बाब संघाच्या पथ्यावरच पडली. कारण यामुळेच शमीची एन्ट्री झाली. आणि यानंतर आपण शामी कडून पंजे पे पंजा आणि सत्ते पे सत्ता हे बघितलं या पूर्ण स्पर्धेत ज्या ज्या खेळाडूला संधी मिळाली त्या त्या खेळाडूंनी सरसेनापतींची भूमिका बजावली आणि आपला तिरंगा डौलाने फडकवला. कधी रोहित, कधी विराट, तर कधी शमी, अय्यर, जडेजा या सर्वांनी आपले शंभर टक्के योगदान दिलं. भारतीय संघ आता क्रिकेटमधील परमोच्च क्षणापासून एक पाऊल दूर आहे.
या पूर्ण स्पर्धेत रोहित शर्माच्या कॅप्टनशिपने सर्वांनाच प्रभावित केलं. संघाचा कर्णधार मैदानात कप्तान असावा आणि मैदानाच्या बाहेर लीडर असावा हे त्यांनी पूर्ण स्पर्धेत दाखवून दिलं. पूर्ण स्पर्धेत त्याचा पहिला दहा षटकातला जो ऍप्रोच होता, तो फारच आक्रमक होता. रोहित ने सुरुवात छान केल्यामुळे मधल्या फळीतील फलंदाजांवर फारसा ताण आला नाही. रोहितच आणखीन विशेष कौतुक यासाठी करेन की हार्दिक पांड्या स्पर्धेबाहेर गेल्यानंतर भारतीय संघाकडे मोजून पाचच गोलंदाज होते. सहावा गोलंदाज औषधालाही नव्हता. या पाचही गोलंदाजांच छान नियोजन करत सहाव्या गोलंदाजांची उणीव भासू दिली नाही हे विशेष. अहमदाबादचे मैदान इतर मैदानापेक्षा मोठ आहे. त्यामुळे मोठे फटके खेळताना थोडीशी सावधानी बाळगणं महत्वाचं आहे.
असो. ऑस्ट्रेलिया संघाचा विचार केला तर वॉर्नर व ट्रेवीस हेड हे सध्यातरी कांगारुच्या धावांचे ट्रेड मार्क आहेत. हे दोन मासे जर लवकर गळाला लागलेत तर मात्र कदाचित कांगारूंना मोठी धावसंख्या रचतांना अडचण येऊ शकते. स्मिथ स्पिनर्स विरुद्ध चाचपडतो हे आपण वारंवार बघितले. त्यामुळे सामन्यातील कुठे दबावाचा विचार केला तर मात्र दबाव ऑस्ट्रेलियावरतीच आहे. ऍडम झम्पा मिडल ओव्हरमध्ये विकेट मिळवून देत नाही ही त्यांच्यासाठी डोकेदुखी आहे. भारताचा विचार केला तर सुरुवातीला हेजलवूड पासून भारतीय फलंदाजांना सावध राहायला पाहिजे. सुरुवातीच्या काही षटकात अवसान घातकी फटक्यांपासून सावध रहाणे गरजेचे आहे. आठवतय ना तुम्हाला 1987 मधला कपिल देवचा तो नटराजन फटका. तिथेच भारतीयांना पॅकअप करावं लागलं होतं.
नॉकआउट स्टेजमध्ये तुमचं टेम्प्रामेंट खऱ्या अर्थाने चेक होतं. यात ऑस्ट्रेलिया संघ उजवा आहे हे सत्य आपल्याला नाकारून चालता येणार नाही. पाच वेळा विश्वचषक जिंकलेला संघ, त्यामुळे नॉक आउट स्टेज मधून बाहेर पडणे त्यांच्या अंगवळणी पडलय असं म्हटलं तर वावग ठरू नये.
असो. बघता बघता स्पर्धेचा 45 वा दिवस आला. आणि स्पर्धेचा शेवटच सामना भारतीय क्रिकेट रसिकासाठी परत दिवाळी साजरी करण्याची उमेद घेऊन आलाय. 2003 आणि 2007 मध्ये ऑस्ट्रेलिया संघाने सर्वच्या सर्व सामने जिंकत एक आगळावेगळा विक्रम रचला होता. आणि भारताला आता त्याच विक्रमाच्या पंक्तीत बसण्याची वेळ आली आहे. 2011 मध्ये भारतात भारताने वर्ल्ड कप जिंकला. 2015 मध्ये ऑस्ट्रेलियाने ऑस्ट्रेलियात, तर 2019 मध्ये इंग्लंडने इंग्लंड मध्ये. आणि आता वेळ आली आहे 2023 मध्ये भारताची मायदेशात जिंकण्याची. सरते शेवटी भारतीय संघाला विजयी भव हा आशीर्वाद करोडो भारतीय देत असतील एवढं मात्र खरं!









