वृत्तसंस्था/ जकार्ता (इंडोनेशिया)
विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या येथे झालेल्या इंडोनेशिया खुल्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत डेन्मार्कचा टॉप सीडेड बॅडमिंटनपटू व्हिक्टर ऍक्सेलसेनने पुरूष एकेरीचे तर चिनी तैपेईच्या ऑलिंपिक रौप्यपदक विजेत्या आणि द्वितीय मानांकित ताय झु यिंगने महिला एकेरीचे जेतेपद पटकाविले.
या स्पर्धेतील रविवारी झालेल्या पुरूष एकेरीच्या अंतिम सामन्यात डेन्मार्कच्या टॉप सीडेड ऍक्सेलसेनने चीनच्या झाओ जुन पेंगचा 21-9, 21-10 अशा सरळ गेम्समध्ये पराभव करत अजिंक्यपद पटकाविले. गेल्या आठवडय़ात ऑलिंपिक चॅम्पियन ऍक्सेलसेनने इंडोनेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धा जिंकली होती. त्याने आता पाठोपाठ दोन स्पर्धा जिंकल्या आहेत.
या स्पर्धेतील महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात चिनी तैपेईच्या द्वितीय मानांकित ताय झु यिंगने चीनच्या आशियाई चॅम्पियन वांग झी ई हिचा 21-23, 21-6, 21-15 अशा गेम्स्मध्ये पराभव करत अजिंक्यपद पटकाविले. या लढतीत यिंगने पहिला गेम गमविल्यानंतर पुढील सलग दोन गेम्स जिंकून वांग झी चे आव्हान संपुष्टात आणले. ताय झु यिंग सोमवारी 28 व्या वर्षांत पदार्पण करीत आहे. तिचे हे सलग दुसरे विजेतेपद आहे. यापूर्वी तिने थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत विजेतेपद मिळविले होते.
या स्पर्धेत चीनच्या झेंग सी वेई आणि हुआंग क्यूयांग यांनी मिश्र दुहेरीचे विजेतेपद पटकाविताना अंतिम सामन्यात जपानच्या युटा आणि अरिसा यांचा 21-14, 21-16 अशा गेम्समध्ये पराभव केला.









