एक महिन्यात होऊ शकते पूर्ण, अनेक नावे समोर
► वृत्तसंस्था / नवी दिल्ली
उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे उपाध्यक्ष जगदीप धनखड यांनी पदत्याग केल्यानंतर आता केंद्रीय निवडणूक आयोगाने उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक प्रक्रियेला प्रारंभ केला आहे. ही प्रक्रिया एक महिन्यात पूर्ण होण्याची शक्यता आहे. तथापि, अद्याप या प्रक्रिया प्रारंभाची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. ती प्रत्यक्ष मतदानाच्या आधी तीन आठवडे केली जाऊ शकते, अशी माहिती आहे.
उपराष्ट्रपतिपद हे देशातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे घटनात्मक पद आहे. या पदाचा कालावधी 5 वर्षांचा असून तो पूर्ण झाल्यानंतरही नव्या उपराष्ट्रपतींची निवड होईपर्यंत आधीचे उपराष्ट्रपती कामकाज पाहतात. सोमवारी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी अकस्मात आपले त्यागपत्र सादर केले. पदत्याग करण्यासाठी त्यांनी प्रकृती अस्वास्थ्य हे कारण असल्याचे स्पष्ट केले आहे.
नवी निवड लवकरात लवकर
जगदीप धनखड यांनी त्यांचे त्यागपत्र राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे पाठविल्यानंतर त्यांनी ते स्वीकृत केले. केंद्रीय गृह विभागाने सूचना केल्यानंतर राष्ट्रपती भवनाकडून तशी घोषणा करण्यात आली. त्यानंतर, चोवीस तासांमध्ये नव्या उपराष्ट्रपतींची निवड करण्यासाठी निवडणूक प्रक्रिया हाती घेण्यात आली. हे घटनात्मक पद अधिक काळ रिक्त ठेवता येणार नसल्याने लवकरात लवकर निवडणूक घेऊन नवी निवड केली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले होते.
नवे निवासस्थान मिळणार
जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपतींचे अधिकृत निवासस्थान सोडल्यानंतर त्यांना नियमानुसार नवे निवासस्थान देण्यात येणार आहे. त्यांची सुरक्षा व्यवस्था आताप्रमाणेच पुढेही राखली जाणार आहे. यासंबंधी निश्चित असे नियम आहेत. या नियमांचे काटेकोर पालन केले जाईल, असे गृह विभागाने स्पष्ट केले आहे.
कशी होते उपराष्ट्रपती निवडणूक…
उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी साधारणत: मतदानाआधी तीन आठवडे अधिसूचना प्रसारित केली जाते. निवडणुकीसाठी दोन किंवा अधिक उमेदवार असल्यास निर्धारित दिवशी मतदान घेतले जाते. लोकसभा आणि राज्यसभेचे खासदार या निवडणुकीसाठीचे मतदार असतात. एकच उमेदवार असेल तर मतदान घेतले जात नाही. निवडणुकीत ज्या उमेदवाराला सर्वाधिक मते मिळतील, त्याची उपराष्ट्रपती म्हणून नियुक्ती केली जाते. या निवडणुकीसाठी उमेदवार भारताचा नागरिक असावा लागतो. त्याचे वय 35 वर्षांच्या वर असावे लागते. तसेच तो लोकसभा, राज्यसभा किंवा विधानसभा अथवा विधान परिषद यांचा सदस्य नसतो. या सभागृहांचा सदस्य असणारी व्यक्ती या निवडणुकीत उमेदवार असल्यास त्याने त्याचे सदस्यत्व सोडले आहे, असे गृहित धरले जाते. ज्या व्यक्तीकडे सरकारी किंवा स्थानिक स्वराज्यसंस्थांशी संबंधित लाभाचे पद आहे, अशी व्यक्ती या निवडणुकीसाठी उमेदवार असू शकत नाही. उपराष्ट्रपतींनी त्यागपत्र दिल्यानंतर किंवा त्यांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर 60 दिवसांच्या आत नव्या उपराष्ट्रपती पदासाठी निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण करावी लागते, असे नियम आहेत. ही निवडणूक गुप्त मतदान पद्धतीने घेतली जाते सध्या लोकसभेत 1 स्थान, तर राज्यसभेत 5 स्थाने रिक्त आहेत. त्यामुळे मतदारांची संख्या 781 इतकी आहे.
आता नावांची चर्चा
धनखड यांच्या स्थानी कोणाची उपराष्ट्रपती म्हणून निवड होणार, यासंबंधी आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. अनेक नावे समोर येत आहेत. लोकसभा आणि राज्यसभा अशा दोन्ही सभागृहांमध्ये सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीला बहुमत असल्याने याच आघाडीचा विजय होणार हे निश्चित मानले जात आहे. मात्र, उमेदवारी भारतीय जनता पक्षाच्या नेत्याला मिळणार, की मित्रपक्षांपैकी कोणाच्या, ही बाब अद्याप स्पष्ट झालेली नाही. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे नाव आश्चर्यकारकरित्या घेतले जात आहे. तथापि, ते हा प्रस्ताव मान्य करतील का, हा प्रश्न आहे. काँग्रेस नेते आणि लोकसभा खासदार शशी थरुर यांचेही नाव घेण्यात येत आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश न•ा यांचीही नावे घेतली जात आहेत.
उमेदवारासंबंधी उत्सुकता शिगेला…
ड उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक लवकरात लवकर घेतली जाणार
ड संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचे नाव उमेदवार म्हणून आघाडीवर
ड नितीश कुमार, शशी थरुर, जगतप्रकाश न•ा यांची नावे समोर
ड येत्या सात ते दहा दिवसांमध्ये उमेदवारासंबंधी निर्णय होणे शक्य









