नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशाचे उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू सोमवारी तीन देशांच्या दौऱयावर रवाना झाले. उपराष्ट्रपतींचा हा दौरा 8 दिवसांचा असेल. नायडू 30 मे रोजी मध्य आफ्रिकेतील गॅबॉन या देशाला पहिल्यांदा भेट देणार आहेत. यानंतर ते पश्चिम आफ्रिकेतील सेनेगल या देशाला भेट देतील. येथून उपराष्ट्रपती 4 जून रोजी कतारला जाणार असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाकडून देण्यात आली. एम. व्यंकय्या नायडू 4 जून ते 7 जून या कालावधीत कतारच्या दौऱयावर असतील. भारताच्या उपराष्ट्रपतींचा हा पहिला कतार दौरा असेल. दोन्ही देशांमधील राजनैतिक संबंधांना 50 वर्षे पूर्ण होत असल्याने ही भेटही महत्त्वाची आहे.









