केरळमधील प्रकार ः 9 कुलगुरुंना राजीनामा देण्याचा आदेश
वृत्तसंस्था/ तिरुअनंतपुरम
केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी 9 विद्यापीठांच्या कुलगुरुंना पद सोडण्याचा आदेश दिल्यावर आता कुलगुरुंनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. केरळ उच्च न्यायालयात यावर सुनावणी होणार आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमांचे उल्लंघन करत एपीजे अब्दुल कलाम तंत्रज्ञान विद्यापीठात कुलगुरुंची नियुक्ती करण्यात आली होती. ही नियुक्ती रद्द करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यावर राज्यपालांनी 9 कुलगुरुंना पद सोडण्याचा आदेश दिला होता.
राज्यपाल आरिफ खान यांच्या या आदेशानंतर राजकीय गदारोळ निर्माण झाला आहे. माकप नेते सीताराम येच्युरी यांनी राज्यपालांच्या या आदेशाला घटनाबाहय़ ठरविले आहे. राज्यपाल विद्यापीठांमध्ये संघ स्वयंसेवकांना नियुक्त करून उच्चशिक्षण व्यवस्थेला नियंत्रित करू पाहत आहेत. राज्यपालांच्या या आदेशाला न्यायालयात आव्हान दिले जाणार असल्याचे येच्युरी यांनी म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवत राज्यपालांनी 9 विद्यापीठांच्या कुलगुरुंना राजीनामा देण्याचा निर्देश दिला होता. या कुलगुरुंना सोमवारी सकाळी 11.30 वाजेपर्यंत राजीनामा देण्यास सांगण्यात आले होते. सर्वोच्च न्यायालयाने एपीजे अब्दुल कलाम तंत्रज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ. राजश्री एम.एस. यांची नियुक्ती रद्द केली होती. युजीसीच्या नियमांनुसार राज्याकडून स्थापन शोध समितीने कुलगुरु पदासाठी किमान 3 नावांची शिफारस करणे आवश्यक होते. परंतु केवळ एकाच नावाची शिफारस करण्यात आल्याचे म्हणत सर्वोच्च न्यायालयाने नियुक्ती रद्द ठरविली होती.









