अध्याय अठ्ठाविसावा
भगवंत म्हणाले, माझी सेवा म्हणून ज्याला मुखात सतत नाम यावे असे वाटत असते त्याने त्यासाठी अनुकूल वातावरण हुडकण्याची आवश्यकता असते. तसे ते लाभावे म्हणून त्याने साधुसेवा करावी. साधुसेवा म्हणजे त्यांच्या शरीराची सेवा नव्हे तर त्यांच्या उपदेशाचे तंतोतंत पालन करावे. असे करत गेल्यास तेथे विघ्नांना थारा मिळत नाही. जो संत सेवा करतो त्याला आपण कोण आहोत आणि सध्याची आपली स्थिती तात्पुरती असून मायिक आहे हे लक्षात येते आणि त्यामुळे समोर दिसणाऱ्या संसाराची त्याला वाटणारी अनिवार ओढ नाहीशी होते. त्यामुळे माझ्या नामस्मरणाशिवाय इतर कोणतेही विचार त्याच्या मनात येणे बंद होते. ह्याप्रमाणे संत जेव्हा साधकांचा पाठीराखा होऊन त्याचा मित्र होतो तेव्हा महाविघ्ने तोंड काळे करतात.
साधूचे चरणोदक घेतल्याने साधक अतिशुद्ध होतो. त्यांची शुद्धी झाल्याने महादोष समूळ नष्ट होतात. साधूंच्या चरणतीर्थापाशी सर्व तीर्थे शुध्द होतात. म्हणून जे भक्तीभावाने साधूंच्या चरणाचे तीर्थ घेतात ते माझी भक्ती करण्यात येणाऱ्या कोणत्याही अडचणींना निष्प्रभ करतात. त्यामुळे कोणत्याही कारणाशिवाय मिळणाऱ्या आनंदाचा त्यांना नित्य लाभ होतो. पूर्वजन्मातील सुकृतामुळे ज्याला संतांच्या पायावर डोकं ठेवायला मिळतं तो कली काळाला सुध्दा जुमानत नाही मग त्याला विघ्ने काय करणार? माणसाला सगळ्यात मोठं भय मृत्यूचं असतं पण संत चरणाचे भाग्य लाभलेल्या साधकाला त्याची काहीच भीती वाटत नाही. त्याला हे माहित असतं की, देहाचे अस्तित्व तात्पुरते असून तो नाहीसा झाला तरी फिकीर करायचं कारण नाही. भागवंतांच्या सांगण्यातले हे मर्म नामदेवरायांनी अचूक ओळखलं होतं. ते म्हणतात, देह जावो अथवा राहो । पांडुरंगी दृढ भावो ।1। चरण न सोडी सर्वथा । आण तुझी पंढरीनाथा ।2। वदनीं तुझे मंगलनाम । हृदयी अखंडित प्रेम ।3। नामा म्हणे केशवराजा । केला पण हा चालवी माझा ।4। माणसाला मृत्यूचं भय दाखवून त्याला घाबरवून सोडणे हे काळाचं शस्त्र आहे पण कुणालाही न घाबरणारे, शूर साधक मृत्यूलाही भीत नसल्याने संत चरणांचा आधार घेऊन काळालाच पिटाळून लावतात. त्यांनी नामाची महती जाणलेली असते. त्यांनी सद्भावाने केलेली संत संगती आणि त्याच्या जोडीला केलेलं अखंड नामस्मरण ह्यामुळे महाबाधेचे निर्दालन होते. हरिनामाची कीर्ति ईश्वराची भक्ती आणि संत संगती ही त्रिवेणी ज्याला लाभते त्याला अडचणी बाधत नाहीत. त्यातही गंमत अशी आहे की, जो माझी भक्ती करण्याच्या उद्देशाने अखंड नामस्मरण करतो त्याच्या मनात सत्संगती करावी अशी इच्छा आपोआपच निर्माण होते. माझ्या सांगण्याबद्दल साशंक असलेले लोक विचारतील की, संतसंगतीप्रमाणे योग, याग, आसन, ध्यान, तप, मंत्र, औषधी ही इतर साधने आहेतच की, मग संत संगतीचे एव्हढे महत्त्व का? तर ह्याचं कारण असं की, अध्यात्मामध्ये देहाभिमान नाहीसा होण्याला फार फार महत्त्व आहे पण संत संगती सोडून इतर साधने करत असताना मी, ही साधने माझ्या स्वत:च्या जीवावर करतोय असे स्वत:चे मोठेपण ठळक करणारे विचार साधकाच्या मनात सतत येत असतात पण संतसंगती साधली की, संतांच्या सान्निध्यात आलेल्या साधकाचे मी पणाचे विचार संत शोषून घेतात आणि त्याचे चित्त शुद्ध करतात. ‘जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती’ असे म्हणतात ते ह्यासाठीच. तुझी खात्री पटवण्यासाठी तुला एक उदाहरण सांगतो. ऐक, जडिबुटी वाल्याकडे एक गोळी असते ती विषारी पदार्थावर ठेवली की, ती त्यातील विष शोषून घेते आणि नंतर पाण्याने धुतली की, गोळीने शोषलेले विष निघून जाते. त्याप्रमाणे संत साधकाच्या मनातले मी पणाचे विष शोषून घेतात पण ते त्यांना बाधत नाही. दुसऱ्यांचे मी पणाचे विष शोषून घेताना, स्वत: त्यापासून बाधित न होण्याची कला संतांना साधलेली असते कारण त्यांचं चित्त पूर्णपणे शुद्ध झालेलं असतं.
क्रमश:








