वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्लीच्या तीस हजारी न्यायालयाने शनिवारी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे सहकारी विभव कुमार याच्या न्यायालयीन कोठडीत 22 जूनपर्यंत वाढ केली आहे. न्यायालयीन कोठडीची मुदत संपल्यानंतर त्याला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर करण्यात आले. शुक्रवारी न्यायालयाने विभव कुमारला एक दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. आम आदमी पक्षाच्या खासदार स्वाती मालीवाल यांच्यावरील प्राणघातक हल्लाप्रकरणी चौकशी केल्यानंतर कुमार याला 31 मे रोजी कोठडीत पाठवण्यात आले होते. 16 मे रोजी मालीवाल यांच्या तक्रारीनंतर दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. कुमारला दिल्ली पोलिसांनी 18 मे रोजी अटक केली होती.









